सासूचा खून करणार्‍या सूनेची पोलिस कोठडीत रवानगी

भुसावळ : सासूशी झालेल्या भांडणानंतर सुनेने विळ्याचे सपासप १२ वार करून सासूचा खून केल्याची घटना शहरातील प.क.कोटेचा शाळेच्या प्रवेशद्वारावरच बुधवारी सायंकाळी घडली होती. या घटनेत  द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७५) यांचा मृत्यू झाला होता तर पोलिसांनी उज्वला रवींद्र सोनवणे (३८) या खून करणार्‍या सुनेला अटक केली होती. गुरुवारी आरोपी सुनेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शहरातील गजानन महाराज नगर भागात प.क.कोटेचा शाळेत वॉचमन म्हणून रवींद्र सोनवणे (४५) यांच्या पत्नी व आईत गेल्या काही महिन्यांपासून बेनाव असल्याने उभयतांमध्ये नेहमीच खटके उडत होते. सोनवणे हे बुधवारी सायंकाळी किराणा घेण्यासाठी बाहेर पडताच दोघांमध्ये वाद झाल्याने सून उज्ज्वलाने सासू द्वारकाबाई यांच्या डोक्यावर, मानेवर व पाठीवर विळ्याचे तब्बल १२ वार करून त्यांची हत्या केली. गुरूवारी भुसावळ ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टरांच्या चमूने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.