सासवड ग्रामीण रुग्णालय होणार ‘उपजिल्हा रुग्णालय’

0

राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती

सासवड : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील हे रुग्णालय आता 30 खाटांवरून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने खास बाब म्हणून सासवड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबतचा नुकताच शासनादेश काढला आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली.

सासवडचे ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याच्या मुख्य ठिकाणचे शासकीय आरोग्य सेवेचे रुग्णालय आहे. येथे अंतःरुग्ण व बाह्यरुग्ण कक्षात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यामुळे एकीकडे जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयास चांगली इमारत व सुविधा देताना सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या क्षमता वाढीसाठी आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर) सहसंचालक यांच्यामार्फत प्रस्ताव दिला होता. त्यास नुकतीच मान्यता मिळाली.

50 खाटा होणार उपलब्ध

सासवडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केल्याने रुग्णालय 30 खाटांवरुन आता 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी अंदाजपत्रक व नकाशे तयार करण्याची कार्यवाही हाती घेण्यात यावी, असे आदेश आहेत. त्याशिवाय वाढीव मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामदेव शिंदे यांनी बदलाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

डॉक्टरांची संख्या होणार सात

सध्या सासवड ग्रामीण रुग्णालयात 3 डॉक्टर आहेत. नव्या मंजुरीत 7 डॉक्टर, फिजीशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन, भुजतज्ज्ञ रुग्णालयात नियुक्त करण्यात येणार आहेत. अधिपरिचारिका सध्या 7 आहेत, त्या 12 होणार आहेत. चतुर्थ श्रेणी सेवक 7 आहेत, ते वाढून 9 होणार, भविष्यात सोनोग्राफी मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औषधपुरवठाही वाढविण्यात येणार आहे.

जागेचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे प्रयत्न

जेजुरी ग्रामीण रुग्णालयापाठोपाठ सासवड ग्रामीण रुग्णालयालाही आता आणखी नवी इमारत मिळेल. तसेच सासवडला उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळत आहे. जागेचा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत इमारत अंदाजपत्रक व नकाशे करण्याची कार्यवाही लवकरच होईल. विजय शिवतारे, राज्यमंत्री