सावित्रीबाई फुले स्मारकात ग्रंथालय सुरु करावे

0

ओबीसी संघर्ष समितीने केली मागणी

पिंपरी: महात्मा फुले पुतळ्यावर मेघडंबरी व फुलेंच्या जीवनावरील म्युरल करावेत. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकुती पुतळ्यावर मेघडंबरी आणि हार घालण्यासाठी कायमस्वरुपी आरसीसी जीना बांधण्यात यावा तसेच सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये अद्ययावत बहुउपयोगी ग्रंथालय उभारावे अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांना याबाबत पत्र दिले आहे.

महात्मा फुले पुतळ्यासमोरील कारंजे दुरुस्त करावे व रोज त्याचा वापर करावा. येथे विद्युत रोषणाई करावी. येथे येणार्‍या नागरिकांच्या सोईसाठी स्वच्छतागृह, पाण्याची टाकी, बसण्यास बाक, साहित्य ठेवण्यासाठी एक खोली बांधावी. पुतळ्यासमोरील उद्यान आणि पुतळ्याकडे येणार्‍या रस्त्यावर दिशादर्शक फलक उभारावेत. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. अद्यापपर्यंत या ठिकाणी ठरल्याप्रमाणे स्पर्धा परिक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिटीश लायब्ररी’ प्रमाणे ग्रंथालय उभारलेले नाही. त्याची चालू आर्थिक वर्षात अंमलबजावणी होऊन पुर्ण क्षमतेने ग्रंथालय उभारावे. नियोजीत अभ्यासिकेत महापुरुषांची तैलचित्रे, फोटो लावावेत. तसेच या हॉलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान घेण्यासाठी आसन व्यवस्था, चित्रफित दाखविण्याची व्यवस्था करावी. या स्मारकात सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा उभारावा. शहराच्या नावलौकिकात भर घालेल असे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक ठरावे, अशी अपेक्षा 28 नोव्हेंबरला महात्मा फुले यांचा स्मृतीदिन आहे. त्यावेळी हजारों अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी समिती सदस्यांनी केली आहे.

Copy