सावधान.. लोकशाहीचा पाचवा स्तंभ आलाय…

0

काल-परवा मराठी मीडियात अभूतपूर्व अशी घटना घडली. मीडियाकर्मी म्हणून जबरदस्त घाबरवणारी सुद्धा. घाबरवणारी याच्यासाठी की, आपल्याकडून जर वैयक्तिक स्तरावर असामाजिक किंवा लोकशाहीविरोधी काही कृत्य झालं तर आपलादेखील हॅशटॅग फेमस केला जाऊ शकतो आणि त्याने वैयक्तिक माझ्यावर किती मोठा परिणाम पडू शकतो, याची कल्पनाच करू शकत नाही. चॅनेलला यामुळे विशेष फरक पडला असेल की, नसेल हे स्पष्ट नसेल तरी ही घटना मात्र विशेष नोंद घेणारी आहे, हे निश्‍चित. चॅनेलच्या विरोधात जो असंतोष बाहेर पडला तो माझ्यासाठी एक पत्रकार म्हणून मला अंतरबाह्य ढवळून काढणारा होता. लोकशाहीचे मुख्य तीन खांब होते मीडिया आल्यामुळे मीडियानेच आपण स्वतः चौथा खांबय म्हणू-म्हणू स्वत:ला एडजेस्ट केलं. मात्र, जागतिकीकरण आणि व्यवसायिकरणाचा फार मोठा प्रादुर्भाव झाल्याने या चौथ्या खांबावर मोठं प्रश्‍नचिन्ह उभं राहिलंय. अपघाताने म्हणा किंवा रोजगाराच्या भुखेने म्हणा, मी या चौथ्या खांबाच्या मातीतला लै लै बारीक कण झालो. म्हणजे माझं आस्तित्व अगदीच न दिसणार्‍या कणाच्या अनेकाव्या भागा एव्हढंच.

पत्रकारिता शिकत असताना मीडियातील कल्पनाविश्‍वाच्या डोहात तरंगत आम्ही मीडियातली पोरं मार्कलिस्ट हातात पडताच एखाद्या चॅनेलचं बुम हातात घेऊन दिल्ली किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जांबाज रिपोर्टींग करत असल्याची स्वप्न पाहत राहतो.

आम्हाला ‘फाइव्ह डब्लू वन एच’च्या सिद्धांताचे उत्तर रटून-रटून पाठ करायला लावून मार्काची भीती घालणार्‍या संस्था त्या सिद्धांताचे प्रॅक्टिकली महत्त्व मात्र फार कमी समजवून सांगतात. विदेशी हेरॉल्ड लासवेलपासून अजेंडा सेटिंग व्हाया टेक्निकल बाजू केवळ इंटरनल आणि एक्स्टर्नल परीक्षांसाठी आमच्या तोंडून वदवून घेतल्या जातात. मीडियातील स्टार माणसांना बोलावून आमच्या त्यांच्यासोबत फोटोबिटो काढून त्यांचा सत्संग घडवून आमच्या आभासी स्वप्नाला अजून विळख्यात अडकविले जाते. मात्र, मीडियाची दुसरी बाजू आम्हाला अगदी कणभर देखील समजावली जात नाही. मीडियाच्या मार्केटमध्ये असलेल्या नोकरीसाठी लागणारं पॅकेज पोरांना कधी व्यवस्थित समजावून सांगितलं जात नाही. बातमीची बेसिक लेव्हलवर कॉपी कशी लिहावी? याचं ज्ञानसुद्धा दुर्दैवाने अनेक पत्रकारीता मास्टरधारी पोरांना नसतं. दुसरीकडं आज गल्लोगल्ली उभी राहत असलेली लघु मीडिया संस्थाने की, ज्यामध्ये ‘मीडिया’ म्हणावं असं काही नसतं, त्यांचा मोठ्या प्रमाणावर झालेला उद्रेक हा भयानक आहे.

आता प्रस्थापित असलेल्या मुख्यधारेच्या मीडियात ही शिकलेली माझ्यासारखी अनेक पोरं ही मीडियात आल्यावर बर्‍याच काळ मजूर पत्रकार म्हणूनच काम करतात. विचारधारा वगैरे गोष्टी हळू-हळू तो आचरणात आणतो आणि विचारधारेवर ठाम असणार्‍या पत्रकारांना नोकरी करीत असताना बराच त्रास सहन करावा लागतो, हे सत्य आहे. कुठला वाद किंवा विचारधारा पोटाचा प्रश्‍न सोडवू शकत नाही. अनेक चळवळीत काम करणार्‍या थोर लोकांबाबत देखील असंच झालेलं असल्याची कित्येक उदाहरणं आहेत. मग कुठेतरी आपल्या विचारांना मुरड घालून पोटापाण्यासाठी आपले विचार वैयक्तिक लेव्हलवर जपत अनेक पोरं मीडियात काम करीत आहेत. काहींना त्यांच्या सोयीच्या विचारांप्रमाणे स्वातंत्र्य देखील आहे व ते मर्यादितच.

पत्रकार म्हणून प्रत्येक विषयावर बोलावं अशी धारणा अनेकांची असते. पण, ते अनेकवेळा शक्य होत नाही. चौथ्या खांबाच्या बळकटीसाठी नानाविध प्रयत्न करत ‘मी इमानदार आहे’ असं वेळोवेळी पत्रकाराला सिद्ध करून द्यावेच लागते. आता या खांबाच्या विश्‍वासनियतेवर प्रश्‍नचिन्ह उभं आहे. अर्थात हे प्रश्‍नचिन्ह अजिबात झूठ नाहीच. कारण मीडियातला उथळपणा फार बोकाळलाय. एकीकडे बोकाळलेपणाचा मोठा लोंढा वाहत असताना दुसरीकडे कुठेतरी एक प्रवाह वाहतोय, जो अजूनही मीडियाची विश्‍वसनीयता टिकवून आहे. अनेक मीडिया समूह कुठल्याना कुठल्या विचारधारेला फॉलो करतात, म्हणजे बायस असतात.

तटस्थता ही क्वचितच एखाद्या समूहात पाहायला मिळत असावी. मात्र, या समूहात पत्रकार म्हणून काम करणारे अनेक लोकं वैयक्तिकस्तरावर सामाजिक बांधिलकीला जपून पत्रकारिता करीत आहेत. मीडियात वाढलेल्या बोकाळलेपणामुळेच चौथ्या खांबावरचा विश्‍वास उडू लागलाय. म्हणूनच या स्तंभावर अवलंबून कितपत आणि का राहायचं? असा सवाल करत लोकं सोशल मीडियावर काम करीत आहेत. तीन स्तंभांबरोबर चौथ्या स्तंभाची लक्तरे आता सोशल मीडियारूपी पाचवा स्तंभ काढू लागलाय, असं चित्र आहे.

नुकतच घडलेलं शेतकरी मारहाण प्रकरण आणि त्याच्या समांतर खासदाराकडून विमान कर्मचार्‍याला मारहाणीची घटना मीडियाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उठवते. खासदाराची कुत्री कशी भेटीसाठी हवालदिल झाली आहेत? हे देखील मीडिया दाखवते आणि शेतकरी मारहाण प्रकरण आपोआप बाजूला सरते. पत्रकारितेत काम करता-करता खरंच न्यूज व्हॅल्यूसाठी आम्ही आमच्याच इमोशन्स विकू लागलोय, याची जाणीव ‘खासदारांची कुत्री वाट बघताहेत!’ अशा बातम्या पाहताना होते. मीडियाकर्मी म्हणून टीआरपीसाठी आम्ही संवेदनाच आम्ही विकतोय का? आता आमची प्रामाणिकता तपासायची वेळ येतेय का? न्यूज व्हॅल्यूसाठी आम्ही आमचीच व्हॅल्यू कमी तर करीत नाही ना? आम्हाला आमची मानसिकता तपासण्याची वेळ आलीय का? अनेक प्रश्‍न उभे ठाकले आहेत. काहीजण प्रामाणिक संघर्ष मात्र निश्‍चितच लक्षात ठेवावा लागेल. मात्र, तो अद्यापतरी म्हणावा असा दबाव बनवू शकलेला नाही. आता सरकार आणि चौथ्या स्तंभासाठी सावधानतेचा इशाराचा परवाच्या ‘त्या’ चॅनेलच्या ट्रोलिंगने दिला आहे. चौथ्या स्तंभावर अशा प्रकारचं कंट्रोल खरोखर गरजेचं आहे? हे एक पत्रकार म्हणून मला तरी योग्य वाटत आहे. सदर चॅनलच्या विरोधातील ट्रेन्डनं अख्खा मीडिया गदगदून हादरला असं म्हणता येत नसलं तरी ‘जागा’ मात्र झाला असावा, असं चित्र दिसत होतं. लोकशाहीचे केवळ चारच स्तंभ आहेत असं म्हणाणार्‍यांना आता लोकशाहीचा ‘पाचवा स्तंभ’ देखील तितकाच सज्ज होतोयं, हे मान्य करावेच लागेल. चार स्तंभाच्या मधोमध सोशल मीडियाचा हा मधला टेकू बनत असलेला स्तंभ आता अधिक ताकतवर होतोय हे नक्की. पत्रकार संजय मिस्किन म्हणतात त्याप्रमाणे लोकशाहीत लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकभावनेचा मजबूत व विश्‍वासार्ह पाचवा स्तंभ म्हणून ‘सोशल मिडीया’स्थान पक्क करतोय हे निश्‍चित. सुदृढ व सक्षम लोकशाहीसाठी इथून पुढं या पाचव्या स्तंभाची भूमिका ही प्रभावी ठरणार आहे.

निलेश झालटे – 9822721292