सावधान! डोंबिवलीत प्लॅस्टिकचे चिनी अंडे!

0

डोंबिवली – संडे असो वा मंडे रोज खा अंडे, अशी एक जाहिरात पूर्वी प्रसिद्ध होती. अंड्याचे आरोग्यविषयक महत्त्व या जाहिरातीमधून सांगितले जायचे. पण आता हीच अंडी लोकांच्या जीवावर उठली आहेत. कलकत्ता, चेन्नई पाठोपाठ आता डोंबिवलीमध्येदेखिल अंड्यामध्ये प्लॅस्टिक सापडले आहे. गोग्रासवाडी येथील रहिवाशी आणि पेशाने शिक्षक असलेल्या अमेय गोखले यांनी काल रात्री एका दुकानातून अंडी विकत घेतली. त्यातील 2 अंड्याचे ऑमलेट केले. मात्र त्यावेळी ऑमलेटमधून जो वास येतो तो आला नाही आणि त्याची चवही एरव्हीपेक्षा वेगळी लागली. त्यामुळे गोखले यांनी अंड्याचे टरफल तपासले. तेव्हा त्यात त्यांना प्लॅस्टिक आढळून आले. या अंड्यांमध्ये पांढर्‍या पिशवी सारखे प्लॅस्टिक असल्याचे गोखले यांनी सांगितले.

कोलकात्यात सापडले होते पहिले प्लॅस्टिक अंडे
डोंबिवलीत अंड्यामध्ये प्लॅस्टिक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पण हे प्लॅस्टिक मिश्रीत अंडे सर्वप्रथम कोलकात्यात सापडले होते. कोलकात्यात राहणार्‍या अनिता कुमार यांनी एका दुकानदाराकडून अंडी आणली होती. या अंड्याचे ऑमलेट बनवत असताना अनिता कुमार यांना अंड्यांच्या दर्जाविषयी शंका आली. अंडी फुटत नव्हती. तसेच अंड्यांना आगीजवळ नेले असता अंड्याचे कवच जळले. कवच जळताना त्यातून प्लॅस्टीक जळल्यासारखा वास येत होता. त्यामुळे अनिता यांचा संशय बळावला. त्यांनी दुसर्‍या दुकानातून अंडी आणली असता त्यामध्ये असा प्रकार झाला नाही. शेवटी अनिता यांनी कृत्रिम अंडी विकल्याप्रकरणी दुकानदार मोहम्मद अन्सारी याच्याविरोधात करिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अन्सारीने दक्षिण भारतातून ही अंडी विकत घेतल्याचा दावा केला आहे. वितरकानेच ही अंडी पाठवली असून त्यानेच ही कृत्रिम अंडी पाठवली असावीत, असा दावा त्याने केला होता. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत चीनची नकली अंडी विकली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या.

प्लॅस्टिक अंडीचे चीन कनेक्शन
याप्रकरणी, अंडी विक्रेता अन्सारी याने आपण घाऊक विक्रेत्याकडूनच ही अंडी विकत घेतो, त्यामुळे ही अंडी नकली असू शकत नाहीत, असा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी यांनी आंध्रप्रदेशच्या एका घाऊक व्यापार्‍याकडून जवळपास दीड लाख रुपयांची अंडी विकत घेतली आहेत. आणि त्याच्या म्हणण्यानुसार, जर अंडी नकली असतील तर, त्या घाऊक व्यापार्‍याने चीनमधून अंडी विकत घेतली असावीत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अंड्याआधी चिनी तांदूळही भारतीय बाजारपेठेत
गेल्या वर्षी केरळमध्ये चीनी तांदूळ विकले जात असल्याची चर्चा होती. तपासा दरम्यान प्लास्टिकपासून बनविलेले तांदूळ मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विकले जात असल्याचे उघड झाले होते. हे तांदूळ बटाटे, गोड बटाटे(स्वीट पोटॅटो) आणि प्लास्टिक यांच्यापासून बनविले जात होते. हे तांदूळ शिजविताना पाण्यावर एक प्लास्टिकचा थर जमा होत होता.

प्लॅस्टिकच्या चिनी अंड्याने कर्करोग
प्लॅस्टिक खाल्याने कर्करोग आणि त्वचेचे रोग होऊ शकतात, असे डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे या प्लॅस्टिकच्या चिनी अंडींमुळेही खाणार्‍याला कर्करोग होवू शकतो, अशी शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येते आहे.

योग्य तो निर्णय घेणे जरूरीचे
सरकारने ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका होणार नाही.
अमेय गोखले, रहिवाशी डोंबिवली.