Private Advt

सावद्यात वीज चोरट्यांचे दणाणले धाबे : 33 वीज मीटर जप्त

52 वीज चोरांविरुद्ध कारवाई : वीज गळती रोखण्यासाठी महावितरणची मोहिम

सावदा : वीज गळती रोखण्यासाठी महावितरण कंपनीने मोहिम आखली असून सावदा शहर व ग्रामीण भागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याने वीज चोरांमध्ये खळबळ उडाली आहे. गत आठवड्याभरात तब्बल 33 वीज मीटर महावितरणने जप्त केले असून विविध कलमान्वये 52 वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

वीज गळती रोखण्याचे प्रयत्न
सध्या विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. या पार्श्वभूमीवर नियमित वीज बिल भरणार्‍यांना भारनियमनाला सामोरे जावे लागत असतांना वीज चोरी करणारे मात्र विजेची चोरी करीत असल्याने वीज कंपनीला चुना लागत आहे. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरट्यांविरोधात मोहिम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत एकूण 270 ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली आहे. फेरफार असलेले 33 मीटर जप्त करण्यात आले आहे. घरगुती, व्यावसायीक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरीकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी दिला आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
वीज चोरी विरोधी धडक मोहिमेत सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योगेश चौधरी, सागर डोळे, योजना चौधरी, मंगेश यादव, सचिन गुळवे, सोनल पावरा, मुख्य तंत्रज्ञ जुम्मा तडवी, वीज कर्मचारी आदी सहभागी झाले. दरम्यान, सावदा शहरात पाच, निंभोरा सात, तासखेडा येथे 10, खिरोद्यात सात, चिनावलला सहा, सिंगनूरला नऊ तर मस्कावदला पाच व कोचूरला तीन वीज चोरट्यांविरोधात कारवाई करण्यात आली.