Private Advt

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांची उचलबांगडी

आणखी तीन शाखा अभियंता रडारवर ः माजी मंत्री खडसे यांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर : कामात अनियमितपणा केल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. माजी महसुलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने 15 डिसेंबर 2021 रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन आदेश काढत यात मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपकार्यकारी अधिकारी (सध्या सावदा येथे सा.बां.उपविभागात कार्यरत) इम्रान बुरहान शेख व तत्कालीन उपविभागीय अधिकारी गणेश पाटील (सध्या चोपडा सा.बां. उपविभाग) या दोघा अधिकार्‍यांची सार्वजनिक बांधकाम उपविभाग रत्नागिरी येथे उचलबांगडी करीत बदली करण्यात आली. शेख व पाटील यांची विभागीय चौकशी लावण्यात आली असून बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजु न झाल्यास सेवेतुन बडतर्फ करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागातील आणखी तीन शाखा अभियंता यांची चौकशी सुरू असून ते देखील रडारवर असल्याचे सांगण्यात आले.

अधिकार्‍यांना भोवली तक्रार
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-वढोदा परीसरातील वढोदा येथील मच्छिंद्रनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता, उमरा, हिवरा, हलखेडा व परीसरातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मुक्ताईनगर अंतर्गत झालेल्या रस्त्याच्या तक्रारी वढोदा येथील जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या. या संदर्भात माजी मंत्री खडसे यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानेच अधिकार्‍यांवर कारवाई झाल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागात खळबळ उडाली आहे.