सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य; थुंकल्यास कारवाई; केंद्राची नियमावली जारी

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहर्‍यावर मास्क घालणे देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर केल्यानंतर यादरम्यानच्या काळात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार.

या नियमावलीनुसार, हॉटस्पॉट भागांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नाही. या भागांमध्ये आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे पालन केले जाईल. या बरोबरच कुणालाही बाहेर पडण्याचे परवानही असणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची डिलिव्हरी घरी करण्यात येईल. इथे केवळ सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांनाच जाण्यायेण्याची मुभा असणार आहे.

आरोग्य, बँकिंगसेवा सुरू राहणार

हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लीनिक, दवाखाने, औषधांची दुकाने, मेडिकल लॅब, सेंटर्स सुरू राहतील. पॅथलॅब आणि औषधांशी संबंधित कंपन्या सुरू राहतील. तसेच बँका आणि एटीएम सुरू राहतील.

Copy