सामनावर बंदी घालणार नाही

0

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावर बंदी घालणार नाही, असे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. तसेच, शिवसेना व भारतीय जनता पक्षाने परस्परांवर टीका करणे योग्य नाही. अशी टीका करताना दोन्ही पक्षांनी भान ठेवणे गरजेचे आहे, असे नायडू म्हणाले.

भाजपच्या प्रचारासाठी नायडू गुरुवारी संध्याकाळी पुण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.

सामनावर 16,20 आणि 21 तारखेला बंदी घालावी, अशा मागणीचे पत्र भाजपने निवडणूक आयोगाला दिले होते. यावर शिवसेनेसह विविध माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावर नायडू यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा भाजपचा स्वभाव नाही. त्यामुळेच आम्ही कोणत्याही वर्तमानपत्रावर बंदी घालणार नाही. ज्यांना जे लिहायचे आहे ते लिहू द्या. मतदार मतदानात जे लिहायचे ते लिहितील, असा टोला शिवसेनेला लगावतानाच भाजपलाही नायडू यांनी घरचा आहेर दिला.

स्थानिक नेत्यांना खडसावले

स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकारणावरूनही नायडू यांनी नेत्यांना खडसावलेे. सांबार खाताना शर्टवर डाग पडला, तर तो जसा उठून दिसतो, त्याप्रमाणे स्वच्छ लोकांच्या भाजपमध्ये गुंड अधिक उठून दिसत आहेत. एखाद्याला पक्षात प्रवेश देताना किंवा उमेदवारी देताना काळजी घ्यायला हवी, असे नायडू म्हणाले. त्यांच्या या विधानाचा रोख भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना प्रवेश देण्याकडे होता.

टीका करताना भान ठेवा

शिवसेना व भाजपमध्ये गेले काही दिवस कलगीतुरा सुरू आहे. या दोन्ही पक्षांकडून परस्परांवर करण्यात येणारी टीका आदर्श नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानंच शिवसेना भाजपवर टीका करत असल्याचा दावाही त्यांनी केला. टीका करताना दोन्ही पक्षांनी भाषेचे भान ठेवायला हवे. आयुष्यभर काँग्रेसवर टीका करणार्‍या शिवसेनेकडून काँग्रेसचे केले जाणारे कौतूक न समजण्यापलीकडे आहे, असे नायडू म्हणाले.

राष्ट्रवादीसोबत जाणार नाही

राज्यातील भाजप सरकारचा पाठिंबा शिवसेनेने काढून घेतला, तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का, या प्रश्‍नावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बुद्धिमान आहेत. त्यामुळे ते आधीच काँग्रेसमधून बाहेर पडले. आता आमच्याकडे पुरेसे बुद्धिमान लोक आहेत, असे सांगत नायडू यांनी राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याचे सूचित केले.

मुळा- मुठा काय नाव आहे?

नदी सुधार प्रकल्पावर बोलताना नायडू एकदम नद्यांच्या नावावरच घसरले. मुळा-मुठा नाम भी होता है, असा प्रश्‍न त्यांनी केला. तसेच, ज्याप्रमाणे बाँबेचे नामकरण मुंबई केले त्याप्रमाणे या नदीचे नाव बदला, असे नायडू यांनी सांगितले.