साने गुरुजी कर्मभूमी स्मारक पायाभरणी समारंभाचे आयोजन

0

अमळनेर । साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या शहरात साने गुरुजी कर्मभूमी स्मारक पायाभरणी समारंभ 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सानेगुरुजींच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री यांच्याहस्ते पायाभरणी समारंभ होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरविंद सराफ हे राहणार आहेत. साने गुरुजींचे कर्मभूमीस्मारक अमळनेर येथे उभारण्यासाठी खान्देशातील साने गुरुजी प्रेमींच्या पुढाकाराने व सहभागाने गलवाडे शिवारात 13 एकर खाजगी जमीन खरेदी करून अमळनेर शहरापासून 5 कि.मी. अंतरावर असणार्‍या जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्ष संवर्धन करून निसर्गरम्य वातावरण तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

समारंभ संयोजन समिती गठीत होणार
नियोजित जागेत येण्याजाण्याचा रस्ता बांधकामाची प्रक्रिया सुरु झाली आहे. कर्मभूमी स्मारकाच्या जागेवर भविष्यात उभाराव्याच्या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा देखील तयार करण्यात आला आहे यात लोक सहभाग व शासनाच्या मदतीने तीन ते पाच टप्प्यात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. साने गुरुजींचे कर्मभूमी स्मारक हे खान्देशच्या युवा पिढीच्या क्षमता विकासाचे केंद्र आणि ऐतेहसिक मानवी मूल्य विचार वृंधिगत करणारे ठिकाण सहल व पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी अमळनेर व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पक्ष, संस्था, संघटना, गट, समूहातील मान्यवर प्रमुख पदाधिकारी, सदस्य यांची एकत्रितपणे महत्वपूर्ण बैठक गुरुवार 22 डिसेंबर रोजी दुपारी 3.30वाजता साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यात समारंभ संयोजन समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन साने गुरुजी कर्मभूमी प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष माजी आमदार गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष चेतन सोनार, कार्यवाहक गोपाळ नेवे, समन्वयक अविनाश पाटील, पाया भरणी समारंभ कार्याध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र चौधरी यांनी केले आहे.