साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण मंत्रालय कमिटी सदस्यपदी निवड

0

नवी दिल्लीः वादग्रस्त विधान करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या मध्यप्रदेश मधील भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करीत आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करीत भोपाळमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता

संरक्षण मंत्रालयाच्या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. यात प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हणून उल्लेख, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त विधान करत चर्चेत राहिल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत चांगलाच गदारोळ केला होता. या वादाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी आहे. तसेच त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.

Copy