सात्विक संस्कार करून जीवनसत्व असलेली शेती करण्याची गरज

0

अंतुर्लीसह यावल शहरात आबासाहेब मोरे यांचे प्रतिपादन : शेतकर्‍यांच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल- शेती विषमुक्त करण्यासाठी कृषी स्वयंरोजगार पुढे आणावयाचा असून सात्विक संस्कार करून ज्यात जीवनसत्व आहे अशी शेती केली पाहिजे , असे विचार स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित मानवी समस्या निवारण कृषी विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र ग्राम नागरी अभियान कार्यक्रमाचे मार्गदर्शक आबासाहेब मोरे (गुरुपुत्र) यांनी येथे व्यक्त केले. यावलसह मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतकर्‍याना संबोधन करून मानवी जीवनाला भेडसावणार्‍या समस्यांबाबत त्यांनी निराकरण केले.

देवापेक्षा करा पितरांची सेवा -आबासाहेब
यावल- शहरातील माधव नगर टेलिफोन ऑफिसजवळ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व साप्ताहिक सेवा केंद्रातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी आबासाहब मोरे म्हणाले की, पितृ पंधरवड्यात दानधर्म करा, देवापेक्षा पितरांची सेवा करा, त्यांना मोक्ष देण्यासाठी पुरवणी सांगणे त्यालाच ज्ञानदान, असे म्हणतात. ज्ञानाने मनुष्य मोठा होतो केंद्र म्हणजे जिथे मानवी समस्या सोडवल्या जातात. साधूने दरोडेखोरांच्या घरातील अन्न ग्रहण केले तर त्याच्यावरही परीणाम तसेच होतात त्यासाठी सात्विक संस्कार व जीवनसत्व युक्त आहार घेण्याची गरज आहे. यासाठी गावरान बियाणे, गावरान गायीचे दुध पेरणी करताना घ्यावयाची काळजी गाईचे शेण गोमूत्र यात अमृताचा वास असतो. शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या जीवावर कंपन्या खूप मोठ्या झाल्यात, उत्पन्नापेक्षा खर्च वाढत आहे, नुसते बॅनर लावून कृषीचे उत्पादन वाढणार नाही, असेही ते म्हणाले.

शेतकर्‍यांनी विषमुक्त शेतीकडे वळावे -आबासाहेब मोरे
अंतुर्ली- शेतकर्‍यांनी रासायनिक खते व औषधांचा वापर टाळून विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा, सेंद्रीय शेती कसण्याकडे कल वाढवावा, असे आवाहन प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र आबासाहेब मोरे यांनी केले. तालुक्यातील अंतुर्ली येथे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा ग्राम व नागरी अभियानांतर्गत मानवी समस्या निवारण, कृषी विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र झाले. प्रसंगी आबासाहेब मोरे यांनी सेंद्रीय शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नाचे दाखले देत अध्यात्मिक सेवा वाढवित भक्ती डोळसपणे करून भारताची संस्कृती टिकविण्याचे आवाहन केले. सण-उत्सवांचे बीभत्सीकरण थांबवा, असे त्यांनी सांगत सेंद्रीय शेतीतून उत्पादीत गहू आरोग्यासाठी किती कसदार आहेत याचे दाखले त्यांनी शेतकर्‍यांना दिले. कितीही ड्रोनने फवारण्या केल्या तरी शेतीचे उत्पन्न वाढणार नाही . यासाठी प्राचीन ऋषीमुनींनी ज्या तंत्रज्ञान व तत्वज्ञानाने शेती कसे संशोधन केले याचा अभ्यास करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.