सातपुड्याच्या कान्याकोपर्‍यात होलिकोत्सवाला उधाण

0

चोपडा । आदिवासी बांधवांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून महत्व असणार्‍या होलिकाउत्सवानिमित्त सातपुड्यातील कान्याकोपर्‍यात चैतन्याला उधाण आल्याचे दिसून येत आहे. समाजबांधवांनी आधी ठिकठिकाणच्या भोंगर्‍या बाजारांमधून नाच-गाण्यांसह खरेदीचा आनंद घेतल्यानंतर या उत्सवाला अक्षरश: उधाण आले आहे. होळीला प्रज्ज्वलीत केल्यानंतर सुमारे चार-पाच दिवसापर्यंत रंगोत्सव चालणार आहे. यानिमित्त अगदी दुरवरून आदिवासी बांधव आपापल्या गावी आले आहेत.

वैजापूरात जनसमुदाय
होळीच्या आधी आदिवासीबहुल गावांमध्ये भोंगर्‍या बाजार भरत असतो. जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगर्‍या बाजार हा चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे भरतो. यावर्षी हा बाजार शनिवारी झाला. भोंगर्‍या बाजार भरतो त्याठिकाणी आजू-बाजूच्या परिसरातील पावरा बांधव एकत्र येतात. वर्षभराचे अन्नधान्य, नवीन कपडे परिधान केले जातात. पारंपारिक ढोल, बासरी आदी वाजवून मनसोक्त नाचले जाते. येथे मोठ्या प्रमाणात खरेदीदेखील होते. या अनुषंगाने वैजापुरातही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील लाखो आदिवासींची उपस्थित होती.

खरेदीसाठी झुंबड
होळीच्या आधी प्रमुख गावांमध्ये भरणार्‍या भोंगर्‍या बाजारांमध्ये खरेदीसाठी आदिवासींची एकच झुंबड उडते. वैजापूरच्या बाजारात पारंपारिक वेशभूषेत लाखोंनी दाखल झालेल्या आदिवासींनी रंगीबेरंगी वस्त्रे, चांदीचे दागिने, मोरपिसांचा टोप, कंबरेला बांधावयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, वाद्ये आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्याचवेळी ढोल, मांदल, थाळी, बासरी, झांज, आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर लहान मुलांपासून तर वृध्दांपर्यंत थिरकत असल्याचेही दिसून आले.

अनेक गैरसमज
आदिवासी बांधवांच्या भोंगर्‍या बाजाराबद्दल अनेक गैरसमज आपल्यामध्ये आहेत. यात विवाह ठरतो, गुलाल टाकून मुले-मुली आपला जोडीदार निवडतात असे सांगितले जाते. मात्र असा कुठलाही प्रकार यात होत नाही. विशेष म्हणजे होळी उत्सवाच्या कालखंडात तब्बल सव्वा ते दीड महिन्यांपर्यंत आदिवासी समाजात विवाहच होत नाहीत. होळी पेटवल्यानंतर चार-पाच दिवसांनी रंगोत्सव संपतो. या नंतरच आदिवासी समाजात विवाह होतात. यामुळे विवाहाचा प्रश्‍न येतोच कुठे ? असा खडा सवाल सुशिक्षित समाजबांधव करतात. हा आमच्या आनंदाचा उत्सव असल्याचे ते आवर्जून सांगत असतात. या अनुषंगाने प्रस्तुत प्रतिनिधीने वैजापूर येथील काही मान्यवरांशी संवाद साधला असता त्यांनीही याच बाबींनी प्रामुख्याने अधोरेखित केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य रामचंद्र भादले, वैजापूरचे उपसरपंच बिलालसिंग बारेला, राजू बारेला आदी मान्यवर उपस्थित होते.