Private Advt

साकेगावात विकासपर्व ; मंगल कार्यालयासह रस्त्यासाठी 35 लाखांचा निधी

0

राज्यासह आदर्श व उत्कृष्ट गाव म्हणून लौकिक वाढणार -आमदार संजय सावकारे

साकेगाव- सामाजिक सलोखा जपणारे साकेगाव गाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आदर्श व उत्कृष्ट स्मार्ट विलेज म्हणून नावारूपाला येईल, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. गावात ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय तसेच प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार निधीतून 35 लाखांचा निधी देण्याबाबतचे पत्र त्यांनी ग्रामपंचायतीला दिले, याप्रसंगी ते बोलत होते. साकेगावची आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण होत असताना गावात मंगल कार्यालयाची उणीव असल्याबाबत माजी सरपंच आनंद ठाकरे यांनी आमदारांसह खासदारांकडे व्यथा मांडली होती. त्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी 20 लाख रुपये मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी देण्याचे आश्‍वासन दिले आहे तर मंगल कार्यालयाच्या वॉल कंपाऊंडसह प्रवेश द्वार व लॉन बांधकामासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी 5 रोजी साकेगाव आदर्श स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारूपाला येण्यासाठी तब्बल 20 लाख रुपये तसेच गावातील बसस्थानक ते ग्रामपंचायत तसेच जिल्हा परीषद शाळेकडे जाणार्‍या प्रमुख मार्गाचे पूर्णपणे डांबरीकरण होण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्यासंदर्भातपत्र स्वाक्षरीनिशी नियोजन मंडळास प्रदान केले. एकूण 35 लाख रुपयांचा निधी आमदारांनी स्थानिक विकास निधीतून दिल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, साकेगावचे माजी सरपंच आनंद ठाकरे, संजय पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख सुभाष कोळी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील, किरण चोपडे आदींची उपस्थिती होती.