साकेगावातील 39 वर्षीय इसमाचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू

0

भुसावळ : शौचासाठी नदीपात्रात गेलेल्या साकेगाव येथील 39 वर्षीय इसमाचा पाय निसटून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेसहा सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विनोद सुनील सोनवणे (39, साकेगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. सोनवणे हे नेहमीप्रमाणे वाघूर नदीपात्रात शौचासह अंघोळीसाठी गेले असता त्यांचा पाय निसटल्याने ते नदीपात्रात पाण्यात बुडाल्याने मयत झाले. याबाबत माहिती कळताच ग्रामस्थांनी त्यांना ट्रामा सेंटरमध्ये हलवले मात्र तेथे डॉक्टर नसल्याने गोदावरी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विजय पोहेकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी साकेगाव गाठून पंचनामा केला. या प्रकरणी किशोर निवृत्ती सोनवणे (साकेगाव) यांच्या खबरीनुसार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विजय श्रावण पोहेकर करीत आहेत.

चार दिवसातील दुसरी घटना
चार दिवसांपूर्वीच अर्थात सोमवारी महामार्ग चौपदरीकरण कामावरील वेल्डिंग सेक्शनमधील कामगार लालबाबू पंडित (45, न्यू दिल्ली) यांचा नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर नदीपात्रातील पाईपात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी ही घटना घडल्याने साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.