Private Advt

साकेगावातील नदीपात्रात आढळला 12 वर्षीय बालकाचा मृतदेह

भुसावळ : 12 वर्षीय बालकाचा मृतदेह तालुक्यातील साकेगाव येथील वाघूर नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली. या बालकाचा नेमका मृत्यू नेमका कसा झाला व हा बालक कुठला ? याची ओळख पटू शकलेली नाही.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
साकेगाव येथील वाघूर रेल्वे पूल ते वाघूर पूलाच्या मध्यभागी नदीच्या काठी 10 ते 12 वर्षाचा मुलगा मृतावस्थेत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तालुक्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, जगदीश भोई आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पाण्यामुळे मुलाचा मृतदेह पूर्णपणे खराब झाला असून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी व त्यांच्या सहकार्‍यांनी शवविच्छेदन केले. भुसावळ शहर व तालुक्यालगतच्या परीसरातून 12 ते 14 वयोगटातील बालक बेपत्ता झाले आहे का? वा पोलिस ठाण्यांमध्ये दाखल हरवल्याच्या नोंदीवरून मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून सुरू आहे. ओळख पटत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. साकेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या बाळावर अंत्यसंस्कार सायंकाळी करण्यात आले. भानखेडा येथील पोलिस पाटील शरद रघुनाथ पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.