सांगवीत 39 वर्षीय इसमाची गळफास घेत आत्महत्या

यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे एका 39 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. किरण अशोक सरोदे (39) असे मयताचे नाव आहे. मयताने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील किरण अशोक सरोदे (39) हा आपल्या सहा वर्षीय मुलासह गावात वास्तव्यास होता व हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी सांयकाळी किरण सरोदे याचा मुलगा देवांग सरोदे हा घराबाहेर रडत असल्याचे पाहून नागरीकांनी त्यास विचारले असता आपल्या वडिलांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले. नागरीकांनी तातडीने घराकडे धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अनिल सरोदे, निलेश पाटील, सतीष सरोदे, निलेश सरोदे, अतुल फिरके, विलास धांडे, निखील पाटील, सुयोग कोळंबे, सुहास पाटील आदींच्या मदतीने मयत किरण सरोदे यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी अनिल सरोदे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास अशोक जवरे करीत आहे. मयत किरण सरोदे याच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी दहा वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Copy