सांगवीत व्यापार्‍याची कार व्यवहारातून सव्वा कोटींची फसवणूक

0

सांगवी : पोर्से आणि लंबोर्गी कंपनीच्या कार विकण्याच्या बहाण्याने एका इसमाने मध्यस्थी करत सांगवी येथील एका व्यापार्‍याची 1 कोटी 15 लाख 83 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2017 पासून 28 नोव्हेंबर 2018 या कालावधीत घडला. याप्रकरणी, विजयकुमार गोपीकुमार रामचंदानी (वय 48, रा. आय फेस सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप उर्फ विकी जगदीश शर्मा (वय 37, रा. साई एम्बेंस, गोविंद गार्डन समोर, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झारखंड येथील कारची पिंपरी चिंचवडमध्ये नोंदणी…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप हा महागड्या गाड्या विकणारा एजंट आहे. त्याने फिर्यादी विजयकुमार यांना पोर्से कंपनीची टू सीटर कार दाखवली. ती कार विजयकुमार यांना पसंत पडली. यातून पुढे या गाडीचा 62 लाख रुपयांना घेण्याचा व्यवहार झाला. दिलीपने पोर्से कंपनीची एक कार विजयकुमार यांना आणून दिली. त्या कारचे झारखंड येथील आरटीओ एनओसी काढून पिंपरी चिंचवड येथे नोंदणी करून देण्याचे आरोपीने मान्य केले. दरम्यान विजयकुमार यांनी दिलीप याला आरटीजीएस द्वारे 34 लाख रुपये दिले.

आरटीजीएसद्वारे 1 कोटी 15 लाखाचा व्यवहार..

असे असताना दिलीप याने स्पोर्ट कंपनीची लिंबोर्गी कार विजयकुमार यांना दाखवली. विजयकुमार यांना ती कार देखील पसंत पडली. लिंबोर्गी कार 65 लाख रुपयांना घेण्याचा व्यवहार ठरला. त्यानुसार विजयकुमार यांनी 62 लाख रुपये दिलीप याच्या बँक खात्यावर आरटीजीएस द्वारे पाठवले. त्यानंतर काही कालावधी नंतर उर्वरित 19 लाख रुपये देखील आरटीजीएस द्वारे दिलीप याच्या खात्यावर पाठवले. असे विजयकुमार यांनी एकूण 1 कोटी 15 लाख 83 हजार दिलीप याच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर दिलीप दोन्ही कार आणि त्यांची मूळ कागदपत्रे विजयकुमार यांच्या नावावर एका आठवड्यात करून देतो असे म्हणून घेऊन गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजयकुमार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत

Copy