सांगली येथील मल्ल रामदास पवार ठरला मानाच्या गदेचा मानकरी

0

भुसावळ। शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख स्व.सुखदेवराव निकम यांच्या स्मृती प्रित्यर्थ तालुका कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र व कामगार दिनी तालुक्यातील फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर पार पडलेल्या कुस्ती मैदानात मानाच्या गदेचा मानकरी सांगली येथील प्रसिद्ध मल्ल रामदास पवार हा ठरला. त्याला मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

पवार याने दिल्लीचा मल्ल सोनूसिंग याचे आव्हान स्वीकारुन तुफानी खेळी करीत पंचानी कुस्तीला वेळ द्या, असे जाहीर करताच रामदास पवार कुस्ती चितपट व्हावी, अशी विनंती केली. दरम्यान मानाचा सामना लांबत असता हिंद केसरी दीनानाथसिंग यांनी पंचाची भूमीका पार पाडत कुस्ती गुणांच्या आधरावर शून्य एक अशा गुणांनी पवार यांना विजयी घोषीत केले. प्रारंभी स्व.सुखदेवराव निकम यांच्या निवास स्थानापासून मल्ल व मान्यवर यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर 1961 चे पाचवे हिंद केसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आखाडा पूजन करण्यात आले. त्यांच्या सोबत नामदेव पहेलवान, शेख पापा शेख कालू, सुधाकर जावळे, सुनील काळे, प्रशांत पाटील, गुरुजितसिंग चाहेल, सभापती सुनील महाजन, माजी उपसभापती गजानन नेमाडे, मुरलीधर पाटील उपस्थित होते.