सहा महिन्यानंतर परतलेल्या फेडररचा विजय

0

पर्थ : टेनिस कोर्टचा किंग रॉजर फेडररने विजयी पुनरागमन केले आहे. होपमन करंडक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत त्याने ब्रिटनच्या डॅन इव्हान्सला ६-३, ६-४ असे हरविले. पर्थ एरिनावर फेडररचे आगमन झाले तेव्हा १३ हजार पाचशे प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रोत्साहन दिले. फेडररने लौकिकास साजेसा खेळ केला. त्याने पुरुष एकेरीचा सामना जिंकून स्वित्झर्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिला एकेरीत बेलिंडा बेन्चीचने हिदर वॉटसनला ७-५, ३-६, ६-२ असे हरवून स्वित्झर्लंडला विजयी आघाडी मिळवून दिली.

सहा महिन्यांच्या ब्रेक
फेडररची जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर घसरण झाली आहे. पूर्वी तो अव्वल क्रमांकावर होता. फेडरर सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रथमच कोर्टवर उतरला होता. गेल्या फेब्रुवारीत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. नंतर पाठदुखीमुळे तो फ्रेंच ओपनमध्ये भाग घेऊ शकला नाही. विंबल्डनदरम्यान त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. त्यानंतर त्याने उर्वरित मोसमात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले होते.

दूर असल्याची रुखरुख
विजयानंतर फेडरर म्हणाला की, ‘तुम्हाला कशाप्रकारे दुखापत होते यावर हे अवलंबून असावे. मुलांना अंघोळ घालताना मला दुखापत झाली. अशा कारणामुळे मला खेळापासून दूर राहायचे नव्हते. ‘ब्रेक’च्या कालावधीत मी इतर गोष्टींचा आनंद लुटला होता, पण नंतर मला टेनिसपासून दूर असल्याची रुखरुख वाटू लागली. सेंटरकोर्टवर उतरल्यानंतर असे स्वागत झाल्यास तुम्ही भारावून जाता.’ फेडररला २०१२च्या विंबल्डनपासून ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविता आलेले नाही.