सशक्त लोकशाहीच्या पायासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे

0

तहसीलदार भाऊसाहेब थोरात ; कुर्‍हा येथे नवमतदार नोंदणी अभियान

भुसावळ- लोकशाहीचा आत्मा निवडणुका आणि निवडणुकांचा आत्मा मतदार याद्या आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही आणखी सशक्त होईल कारण लोकशाहीचा पाया मतदार ठरवतात, असे विचार भुसावळचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी व्यक्त केले. कुर्‍हा येथे शिवसेना आणि युवा सेनेतर्फे आयोजित नवमतदार नोंदणी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदारांनी नमुना सहा कसा भरायचा याबाबत मार्गदर्शन केले.

लोकशाही जिवंत असल्याचा आला अनुभव
तहसील कार्यालय व भुसावळ शिवसेना व युवासेनेच्या वतीने रविवारी भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा येथे आयोजित मतदार नोंदणी शिबिरात लोकशाहीच्या जीवंतपणाचा अनुभव सर्वांना आला. महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थ्यांनी पहिल्या शिबिरात दोनशे नवमतदारांनी नोंदणी केली व या भागातील बीएलओंकडे मतदार यादीतील दुरूस्तीबाबतचे अर्जही दिले. भारत निवडणूक आयोगाने यंदा तरुण, दिव्यांग व महिलांसाठी सुलभ निवडणूकीचे धोरण हाती घेतले आहे. मुलांना, दिव्यांग व महिलांना सहज व सुलभपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, असा धोरणाचा हेतू आहे. यातूनच घेतलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी नायब तहसीलदार विजय भालेराव, योगेश मुकस्वाट, शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवण, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, भुसावळ शिवसेना शहरप्रमुख बबलू ब-हाटे, युवासेना उप जिल्हा अधिकारी चंद्रकांत शर्मा, विद्यार्थी सेना शहरप्रमुख हेमंत ब-हाटे, युवासेना भुसावळ शहर चिटणीस सुरज पाटील, सरपंच रामलाल बड़गुजर, शिवसेना गाव पदाधिकारी पिंटू नागपुरे, सचिन सोनार, प्रदुम्न्न पाटील, संकेत काळे, किशोर धोबी, राजु पाटील, जगदीश सुतार, संदीप चौधरी, पवन टोंगळे, दीपक काळे, गणेश बड्गुजर, अरुन बडगुजर, गजू पाटील, पिंटू उंबरकर, भगवान पाटील यांच्यासह मतदार व नागरीक यावेळी उपस्थित होते.