सलोखा राखून जयंती साजरी करावी

0

भुसावळ । शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध मंडळांतर्फे मिरवणूका काढण्यात येत असतात, मात्र कार्यकर्त्यांनी यावेळी शहरातील शांततेसह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार करु नये, शोभायात्रेत देखावे सादर करताना कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही याची जाणीव ठेवावी अशा सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल्ल यांनी केल्या. बुधवार 15 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे बाजारपेठ पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, डिवायएसपी निलोत्पल्ल, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांची उपस्थिती होती.

शिवप्रेमींनी एकदाच साजरी करावी जयंती
यावेळी बोलताना डिवायएसपी निलोत्पल यांनी सांगितले की, शासनाने दिलेल्या वेळेचे भान ठेवून 10 वाजेच्या आत मिरवणूक शांततेत पार पाडणे तसेच आपली वाजंत्री बंद करुन महाराजांच्या पुतळ्यापर्यंत लवकर पोहचले तर येणार्‍या जाणार्‍यांना आपण केलेल्या देखाव्याचा लाभ होईल. तसेच उपनगराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र अशा महापुरुषाची जयंती हि दोन वेळा येत असते त्यामुळे शिवभक्तांनी एकत्र येऊन एकादाच जयंती साजरी केल्यास समाजात एकोपा दिसून येईल तसेच पोलीस प्रशासनावर बंदोबस्तासाठी तणाव येत असतो. याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले.

डिजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा उपयोग करावा
पोलिसांनी केलेल्या सुचनांचा आदर करावा. पालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहे ते बुजविण्याचे काम तसेच रस्त्यावर मिरवणुकीसाठी रोषणाईचे काम पालिकेत सुरु करण्यात आले असल्याचेही उपनगराध्यक्ष लोणारी यांनी सांगितले. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी मार्गदर्शन केले की, जयंती मिरवणूक काढताना मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही प्रकारेे गालबोट लागता कामा नये, तसेच परवानगी घेवूनच मिरवणूक काढावी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचा आदर करावा. डीजेऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य द्यावे ज्या मंडळाने डीजे लावल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशा सुचना देखील पोलीस निरीक्षक सरोदे यांनी केल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत मोरे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, सोनी ठाकूर, अबरार शेख, नमा शर्मा आदी शिवप्रेमी तसेच गोपनीय शाखेचे छोटू वैद्य आदी कर्मचारी उपस्थित होते.