सलमानला दिलासा; अवैध शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष

0

जोधपूर । काळवीट शिकारप्रकरणी चित्रपट अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. अवैध शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून जोधपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी त्याची निर्दोष सुटका केली. सबळ पुराव्याअभावी आणि संशयाचा फायदा देत न्यायालयाने सलमानला दोषमुक्त केले. हा निकाल सुनावण्यात आला तेव्हा स्वतः सलमान, त्याची बहीण अलविरा हिची न्यायालयात उपस्थिती होती.

न्यायालयाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी
न्यायालयाबाहेर त्याच्या चाहत्याची मोठी गर्दी झाली होती. काळवीट शिकारप्रकरणात सलमानविरुद्ध एकूण चार गुन्हे दाखल असून, अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याचा निकाल आता लागला आहे. उर्वरित आरोपांचे निकाल अद्याप बाकी आहे, त्यामुळे सलमानचा जीव अद्यापही टांगणीला लागलेला आहे. 1998 साली ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान परवाना संपलेले शस्त्र वापरल्याबद्दल जोधपूर पोलिसांनी सलमान खानविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तब्बल 20 साक्षीदारांची तपासणी
2 ऑक्टोबरला याच शस्त्राने त्याने काळवीटाची शिकार केली होती. या प्रकरणी गेल्यावर्षी 9 डिसेंबरपासून या खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. तब्बल 20 साक्षीदार तपासण्यात आले होते. अखेर बुधवारी या प्रकरणातून तो सहीसलामत बाहेर पडला. निकाल ऐकल्यानंतर सलमान न्यायालयाच्या बाहेर आला. तेव्हा मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी झालेली होती.