सर्व खासदारांना सोबत घेऊन मोदींना भेटणार: शरद पवार

0

मुंबई: कोरोनाचे संकट असतांनाच महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. त्यात ऐन काढणी-कापणीला हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आजपासून त्यांचा दौरा सुरु झाला आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी शरद पवार थेट शेतीच्या बांधावर पोहोचले आहे. आज रविवारी सकाळी ते उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.

दरम्यान महाराष्ट्रातील या संकटासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यापुढे मोठे संकट आहे. राज्याला अनेक मर्यादा असतात, राज्य सरकारकडून मदत शक्य नाही. केंद्राने मदतीसाठी पुढे यावे असे सांगत त्यांनी राज्यातील सर्व खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट घेणार असल्याचे सांगितले. येत्या आठ ते दहा दिवसांत मोदींची भेट घेऊ असे पवारांनी सांगितले.

तुमच्या पाठीशी राज्य सरकार आहे. राज्य सरकार सर्वपरीने मदत करण्याची तयारी दाखवली आहे. तुमच्या पदरात काही तरी पडेल यासाठी प्रयत्न असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी शरद पवार दौरा करत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर-परंडा तालुक्यापासून केली आहे.

Copy