‘सर्वोदय’ छात्रालयप्रकरणी डॉ.वंदना वाघचौरेंना नोटीस

सात दिवसात जागा मालकीची कागदपत्रे सादर करण्याचे मुख्याधिकार्‍यांनी बजावले : तर कारवाईचा इशारा

भुसावळ : सर्वोदय छात्रालयाच्या जागेवरून शहराचे राजकारण तापले असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी डॉ.वंदना वाघचौरे यांना सोमवार, 28 जून रोजी नोटीस बजावली आहे. माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या काळात ही जागा मिळाल्याचा संदर्भ देत डॉ.वाघचौरे यांनी दिल्याने पालिका अभिलेखावर कोणत्या कागदपत्रांच्या आधारे नाव लावण्यात आले? अशी विचारणा नोटीसीद्वारे करण्यात आली असून सात दिवसात संबंधित कागदपत्रे सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने पुढील कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.

डॉ.वंदना वाघचौरेंच्या अडचणीत वाढ
डॉ.वंदना उमेंद्र वाघचौरे यांनी बाजारपेठ पोलिसांना दिलेल्या एका पत्रात सर्वोदय छात्रालयाची जागा रेखा संतोष चौधरी या नगराध्यक्षा असताना मिळाल्याचा दावा केला होता व पत्राचा संदर्भ पालिका मुख्याधिकार्‍यांना घेत डॉ.वाघचौरे यांना 28 रोजी नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार नगरपालिका अभिलेखावर 4/347/1 या मालमत्तेचे नाव कोणत्या कागदपत्रांच्या आधारे लावण्यात आले? आपल्याकडील अर्जाची पोहोच वा तत्सम कागदपत्रे तसेच या मालमत्तेच्या संदर्भात मालकी हक्क सिद्ध करणारी कागदपत्रे (उदा- खरेदीखताची नक्कल/सातबारा उतारा/सीटी सर्वे उतारा) वा तत्कालीन नगराध्यक्षा रेखा चौधरी यांच्या कार्यकाळात जागा दिल्याबद्दल पालिकेचा ठराव आदी कागदपत्रे सात दिवसांच्या आत सादर करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.