सर्वोच्च न्यायालयाचे आधुनिक पाऊल

0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आता ऑनलाईन याचिका दाखल करता येणार आहे.  सर्वोच्च न्यायालयात इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन याचिका आणि कागदपत्र दाखल करण्याच्या सुविधेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्यासोबतच सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधीश उपस्थित होते.

आता देश बदलू लागला आहे, सुट्टी असूनही आपण काम करत आहोत.
सर्वोच्च न्यायालयाने या सुविधेच्या माध्यमातून आधुनिकतेच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. सरन्यायाधीश आणि सर्व न्यायाधीशांना मी याप्रसंगी शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण सोहळ्या वेळी शुभेच्छा देताना म्हटले आहे.

सॉफ्टवेअरमध्ये आव्हान नाही आहे, हार्डवेअरमध्येही नाही, मात्र यासाठी आपल्याला समाजाची मानसिकता बनवावी लागेल. एखादी चेन थांबली तर संपूर्ण प्रक्रिया थांबते, असे म्हणत मोदींनी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सीजेआयसोबतच्या भेटीत त्यांनी प्रलंबित खटल्यांबद्दल चिंता व्यक्त केल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. ए-4 साईझचा कागद तयार करण्यासाठी 10 लीटर पाणी खर्च होते. मात्र ऑनलाईन सुविधेमुळे पेपरलेस कामकाज करण्यासाठी मदत होईल, सोबतच कामामध्ये गतीही येईल असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत.