प्रभाग 1 मधील नागरिक समस्यांच्या गर्तेत

0

जळगाव: प्रभाग क्रमांक 1 मधील दांडेकर नगर, दुध फेडरेशन, राधाकृष्ण नगर, लाकुडपेठ, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर परिसरात पाहणी करुन समस्या जाणून घेतल्या. नागरी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाने साफसफाईचा मक्ता दिला असला तरी परिसरात साफसफाई होत नाही.गटर साफ केली जात नाही.पथदिवे बंद आहेत.पाणी पुरवठा नियमित होत नाही.वीजेच्या तारा लोंबकळल्या आहेत,अशा विविध सुविधांचा अभाव आहे. दरम्यान,नूतन उपमहापौर सुनील खडके हे उद्या दि.23 पासून ’उपमहापौर आपल्या दारी’या उपक्रमातर्गंत प्रभागनिहाय पाहणी दौरा करणार आहेत. त्या दौरा केवळ दौरा ठरु नये,तर दौर्‍यानंतर त्यांनी किमान मुलभूत सुविधाच्या पुरविण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करुन सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी माफक अपेक्षा आहे.

साफसफाईचा अभाव
साफसफाईसाठी मनपाने ठेका दिला आहे.तरीही देखील साफसफाई होताना दिसत नाही. साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात बर्‍याच खुल्या जागा आहेत. खुल्या जांगावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. सांडपाण्याची डबकी साचले आहेत.त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. डेंग्यू सारखे साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासन दखल घेत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.

लोंबकळलेल्या वीज तारांचा धोका
प्रभाग 1 मध्ये विजेच्या तारा लोंबकळल्या असल्याने धोका निर्माण झाला आहे. घराच्या गच्चीवर जाताना अक्षरश: जीव मुठीत टाकून जावे लागते.यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत.मात्र प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नाही. पथदिवेही बंद आहेत.त्यामुळे परिसरात अंधारात असतो. वाहतुकीला अडथळा ठरत असलेला इंद्रप्रस्थनगरातील वीजेचा खांब स्थलांतरीत करावा यासाठी निवेदन देवूनही स्थलांतरीत करण्यात आलेला नाही.

आमदार,नगरसेवकांविरुध्द रोष
नगरसेवक निवडून आल्यानंतर परिसरात फिरकत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे.निवडणूकीत मोठ मोठे आश्‍वासन देवून जळगाव शहराचा कायापालट करु असे सांगितले.मात्र सत्तेत येवून दोन वर्ष झाले तरी देखील साध्या मुलभूत सुविधा देखील मिळत नाही. शिवाजीनगरच्या उड्डाणपुलाचे काम असल्यामुळे वाहतूक दुध फेडरेशनकडून वळविण्यात आली आहे. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी देखील लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकांदडून प्रशासनासह आमदार आणि नगरसेवकांविरुध्द रोष व्यक्त होत आहे.

Copy