Private Advt

सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प : ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव : आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसून आधीच्या योजनांनाच वाढीव निधी देण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल अशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. फक्त आभासी विकास दाखविणार्‍या केंद्र सरकार प्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प हा निव्वळ आभासी या स्वरूपातील असून यात कोणत्याही भरीव तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. यातच शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी कोणत्याच महत्वाच्या घोषणा करण्यात आलेला नसल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर आणि एकंदरीतच या अर्थसंकल्पावर ना. गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, देशात सध्या नैराश्याचे वातावरण असून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य कामगार, औद्योगीक आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी हे अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेचा गाडा अद्यापही रूळावर आलेला नसल्यामुळे बजेटमध्ये काही तरी ठोस तरतुदी होतील अशी अपेक्षात असतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र केवळ आभासी आणि आकडेवारींचा खेळ करणारा बजेट सादर केला असल्याची टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

या संदर्भात ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पूर्णपणे फसलेली असून यातून कोणताही विकास साधण्यात आला नसतांना यंदा देखील याचेच तुणतुणे वाजविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प सोडून फक्त मेट्रोंना प्राधान्य दिलेले आहे. तर याचा अपवाद वगळता राज्यातील जनतेसाठी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे केंद्र सरकारने जनतेच्या आणि विशेष करून महाराष्ट्रातील नागरिकांच्या तोंडाला पाने फासली आहेत. हा अर्थसंकल्प गोरगरिबांच्या, शेतकरी आणि कष्टर्‍यांसह मध्यमवर्गियांच्या जखमांवर मीठ चोळणारा असल्याची टीका देखील पालकमंत्र्यांनी केली.