सराव सामन्यासाठी भारत अ चे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे

0

मुंबई: सध्या धमाकेदार फार्मात असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणा-या ऑस्ट्रेलियाच्या सराव सामन्यासाठी भारत अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. हा सामना येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या संघात सर्व युवा खेळाडूंचा समावेश असून ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी संघ तयारी करत आहे.

या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या भारत अ संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा असून रणजी स्पर्धेतील कामगिरीवरून त्यांची निवड करण्यात आली आहे, त्यात सर्वाधिक धावा जमविणारा गुजरातचा प्रियंक पांचाळ व सेनादलाचा जी. राहुल सिंग यांचा समावेश आहे. कसोटीसाठी इशान किशनला यष्टिरक्षक म्हणून तयार करण्यात येत असून ऋषभ पंतकडे निव्वळ फलंदाज म्हणून पाहिले जात असल्याचे निवड समितीने पुन्हा एकदा स्पष्ट केले. या संघात महाराष्ट्राच्या अंकित बावणेलाही स्थान मिळाले असून त्याने दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात नाबाद ३५१ धावांची खेळी केली होती. शिवाय स्पर्धेत ६८७ धावांही जमविल्या.

काही खेळाडूंची निवड त्यांची गुणवत्ता पाहून करण्यात आली असून त्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा समावेश आहे. दिल्लीच्या क्रिकेट वर्तुळात त्याच्या गुणवत्तेची बरीच चर्चा केली जात आहे. शेष भारत संघातून खेळलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचीही निवड करण्यात आली आहे तर मुंबईच्या अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या लढतीत आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविण्याची आणखी एक संधी देण्यात आली आहे. कर्नाटकचा ऑफस्पिनर कृष्णाप्पा गौतम, चायनामन गोलंदाज कुलदीप यादव, झारखंडचा रणजीत सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज शाहबाज नदीम यांचीही या संघात निवड झाली आहे. बंगालचा अशोक दिंडा हा ३० वर्षावरील एकमेव गोलंदाज या संघात आहे.