‘सरकार’ आहे की ‘सर्कस’? : भाजपची टीका

मुंबई: येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. टास्क फोर्सने शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, राज्य सरकारने शाळा सुरु होण्याच्या जीआरला स्थगिती दिली आहे. यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, ‘सरकार’ आहे की ‘सर्कस’, अशी खोचक टीका केली आहे.

ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. प्रत्येक वर्गात कमाल २० विद्यार्थ्यांनाच परवानगी दिली होती. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील, असे सांगितले होते. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत. यावर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले आहे. ‘सरकार’ आहे की, ‘सर्कस’? १५ टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेतला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल! पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या टोलवाटोलवीच्या धोरणामुळे त्रस्त झाले आहेत. जनतेची दिशाभूल करु नका, ठोस निर्णय घ्या, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री घोषित करतात. काल टास्क फोर्स निर्णयाला आक्षेप घेते. निर्णय घेण्यापूर्वीच टास्क फोर्सचा सल्ला का घेतला नाही, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका

मुंबईत रात्री १० पर्यंत बार आणि मॉल सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्तीच्या परिक्षेसाठी फक्त कोरोना आडवा येतो का? पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या ‘धोरण लकव्या’मुळे त्रस्त झाले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका. मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांचा आदेश, मुंबईतही शिष्यवृत्तीची परीक्षा घ्या. महानगरपालिकेचा उलटा आदेश, परीक्षा होऊ देणार नाही. राज्यभरातील ७ लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देतील. मात्र,राज्य सरकारच्या ‘धोरण लकव्या’मुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची संधी हुकेल, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.