सरकारी कोविड सेंटरला 100 रेमडेसिव्हीर इंजेक्शन देणार

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे आश्वासन

नवापूर। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सुविधेबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नवापूर तालुक्यात पाहणी दौरा केला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या 20 बेड कोविड सेंटरची पाहणी करून याठिकाणी आणखी बेड वाढविण्याचे मार्गदर्शन केले. तसेच रुग्णालयाच्या आवारात काम सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरलाही कोविड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले. तसेच नवापूर तालुक्यासाठी 100 रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

शहरातील टाऊन हॉलमध्ये नगरपरिषदेद्वारे सुरु केलेल्या 50 ऑक्सिजनयुक्त बेड रुग्णालयाची पाहणी करून याठिकाणी ऑक्सिजन व पुरेसे मनुष्यबळासह औषधसाठा उपलब्ध करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला दिल्या. त्यानंतर चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटलमधील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथे 83 रूग्ण उपचार घेत आहे. यावेळी रूग्णालयात बेड फुल झाल्याने अनेक रुग्ण उघड्यावर मैदानात उपचार करीत होते. जवळच नातेवाईक बसून होते. त्याठिकाणी अत्यंत निष्काळजी प्रकार दिसून आला. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. सर्वच तालुक्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड, आयसोलेशन सुविधा, तात्काळ सुरू करून जिल्हा प्रशासन नागरिकांना वेळेवर उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.