सरकारला नाही फुटणार पाझर

0

मुंबई । शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. कर्जमाफीबद्दल सरकार काहीच निर्णय घेत नाही. सरकारचे हृदय कुठल्या दगडाचे आहे. सरकारला पाझर फुटत नाही. पाषाणालाही पाझर फुटेल, पण काही तरी द्या माया दाखवावी, असा हल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी केला.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मुद्दा नियम 289 अन्वये मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी कर्जातून बाहेर येत नाही. शेतकर्‍यांना भाव मिळत नाही त्यासाठी सरकार प्रयत्न करीत नाही अशी सध्या अवस्था आहे. सरकारकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली जात नाही. राज्यातला शेतकरी त्यांच्याकडे एक टक लावून पाहत आहे. मुख्यमंत्री चंद्रपूरमध्ये आले होते त्यावेळी तेथे एका शेतकर्‍याने आत्महत्या केली होती. मात्र, मुख्यमंत्री तिकडे फिरकलेसुद्धा नाही. पोलिसांना पंचनामा करायला 6 तास लागले, असा संताप मुंडे यांनी व्यक्त केला.