सरकारच्या विरोधात आवाज उठवू

0

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

मंचर : मंचर येथील विकास दूध संस्थेने दूध व्यवसायाबरोबरच पतसंस्था सुरू करून संस्थेच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध व्यवसायासाठी कर्जपुरवठा करून स्वत:ची पत निर्माण केली आहे आहे. दूध संस्था आर्थिक अडचणीत असताना सरकारने बाजारभाव वाढविले. पुन्हा बाजारभाव कमी केले आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. दूध दर वाढीसाठी सरकारच्या विरोधात आवाज उठवू असा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

मंचर येथील विकास दूध संस्थेने उभारण्यात आलेल्या नूतन सभागृहाचे उद्घाटन दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, कांता बाणखेले, प्रविण मोरडे, अल्लु इनामदार, ह. भ. प. संतोष महाराज बढेकर, कैलास गांजाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंचर येथील विकास दूध संस्थचे केवळ 124 सभासद आहेत. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, युवक वर्ग, दूध संस्था गवळी यांचा समन्वय असल्यामुळे विकास दूध संस्थेने प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. तोट्यात चाललेल्या सहकारी संस्थांनी विकास दूध संस्थेच्या प्रगतीच्या आलेखाची माहिती घ्यावी, असे वळसे पाटील यांनी सांगितले.