सरकारकडून महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीची जय्यत तयारी

0

जयंती साजरी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती समारंभ साजरा करण्यात येणार आहे. यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये ग्रामविकास मंत्री, मंत्री ऊर्जा, उद्योग मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तर ग्रामविकास सचिव हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या संबंधी शासन निर्णय काढला गेला असून या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन राज्यभरात करण्यात येणार आहे.

महात्मा गांधी यांनी दिलेली शिकवण व आचरणात आणलेली मुल्ये आपल्या कृतीतून पुढे घेऊन जाण्याकरिता तसेच त्यांचा संदेश जगभरातील पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी २०१८ या वर्षापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनस्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री सदस्य म्हणून सहभागी आहेत. महात्मा गांधीजींच्या कार्य आणि विचारधारेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती उच्चस्तरीय समिती तसेच राज्यात महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांवर देखरेख, नियंत्रण ठेवेल, मार्गदर्शन करील. यासंबंधीचा शासननिर्णय ग्रामविकास विभागाने दि. २४ सप्टेंबर रोजी निर्गमित केला आहे.

Copy