समृध्द महाराष्ट्र योजनेतून नवचैतन्य

0

धुळे : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून तयार केलेली समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माध्यमातून राज्यात नवचैतन्याची निर्मिती होईल. या योजनेसाठी शिंदखेडा तालुक्याची पथदर्शी तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकर्‍यांनी प्रगती साधावी, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. शिंदखेडा येथील पंचायत समितीच्या आवारात आज दुपारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेबाबत मार्गदर्शन
यावेळी मंत्री श्री. रावल यांच्याहस्ते सिंचन विहिरींच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. मंत्री श्री. रावल म्हणाले, रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज करताना या योजनेचा अभ्यास करता आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून 11 कलमी महत्त्वाकांक्षी समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना अस्तित्वात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणत समृध्दी आणावयाची आहे. शिंदखेडा तालुक्यात एकूण 3600 विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. त्यातून 100 कोटी रुपयांचा निधी तालुक्यास मिळणार आहे. त्यामुळे सिंचन विहिरींच्या कामांना तत्काळ सुरवात करावी. विहिरींचे काम 70 टक्क्यांपर्यंत आल्यावर वीज जोडणीची व्यवस्था करण्यात येईल. विहिरींच्या माध्यमातून 15 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आगामी काळात जलयुक्त शिवारात तालुक्यातील प्रत्येक गावाचा समावेश करण्याचे नियोजन आहे. त्यातून भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी विकास कामे होताना गुणवत्तेची पाहणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात बुराई नदी बारमाही करण्यात येईल. या नदीवर ठिकठिकाणी 40 बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गिरासे, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे, अनिल सोनवणे, बीडीओ सुरेश शिवदे, संजीवनी शिसोदे यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. रावल यांनी सुलवाडे- जामफळ योजना, तापी- बुराई योजना, उपसा सिंचन योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य श्री. निकम म्हणाले, शेतकरी स्वावलंबी व्हावा म्हणून समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा. शिंदखेडा तालुक्यात विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत.