समाज माध्यमांना ग्लानी येते तेव्हा..

0

काल कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांचा खून झाला. एखाद्या सामान्य नागरिकाचा खून झाला असता तर …अमुक वादातून एकाची हत्या.. एवढ्या बातमीपुरता हा विषय मर्यादित होता. परंतु, प्रा. किरवले यांचे साहित्य आणि पुरोगामी विचार प्रसारात मोलाचे योगदान असल्यामुळे समाज माध्यमात सोशल मीडियात त्याचे तीव्र पडसाद उमटले. किरवले यांच्या हत्येचा मीसुद्धा निषेध करतो. व्यक्ती सामान्य असो की, असामान्य कुणाचीही हत्या होता कामा नये. मात्र, किरवले यांची हत्या आणि समाज माध्यमे बघितली की, या माध्यमात कार्यरत लोक कसे उथळ आणि फास्टफूड प्रिय आहेत याची साक्ष पटते. किरवले कोण होते याची सुतराम माहिती नसताना सगळ्यात आधी कोण पोस्ट टाकतो आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्याची खाज शमवून घेतो याची जणू स्पर्धाच लागली होती. आजही ती सुरू आहे. एखादी गोष्ट गृहीत धरून आपण जेव्हा खूप अंतर गाठतो तेव्हा न कळत आपण कोणत्यातरी घटकावर अन्याय करीत असतो हे लक्षात घ्यायला हवे.

… किरवले यांची हत्या हेच का अच्छे दिन? …. मनुवादाचा आणखी एक बळी…. विचारवंतांच्या हत्येचे सत्र थांबेल काय?… दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर आता किरवले… किरवले यांची हत्या करणार्‍या भेकडांचा जाहीर निषेध… पोलिसांनी मास्टर माइंड शोधावे.. पुन्हा एक हत्या, महाराष्ट्राला झालंय तरी काय? अशा शेकडो पोस्ट वाचायला मिळत आहेत. आंबेडकरी चळवळीत किरवले सरांचे योगदान खूप मोठे आहे हे मान्य करूनही एखाद्या व्यक्तीच्या हत्येचा आपण समजदार म्हणून घेणारी माणसं कसा दुरुपयोग करतो आणि लोकांचे चित्त विचलित करतो याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. प्रा. किरवले यांची हत्या प्रीतम पाटील या फर्निचर व्यवसायी व्यक्तीने केली आहे तसे त्याने स्वतःच एका मित्राजवळ कबूल केले आहे. प्रीतम पाटीलचे वडील गणपती पाटील हे प्रा. किरवले यांचे गेली 15 वर्षे मित्र आहेत आणि किरवले यांचे घरापासून 100 फूट अंतरावर ते राहतात. ही हत्या व्यक्तिगत कारणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रीतम पाटील सध्या फरार आहे, हा लेख प्रकाशित होईपर्यंत तो पकडला किंवा शरण जाईल, तो पकडला गेला की सगळा घटनाक्रम बाहेर येईल, तरीही हत्येच्या निमित्ताने सगळे कंगोरे तपासण्याची तयारी पोलिसांनी दाखवली आहे. डीवायएसपी हर्ष पोतदार त्याचा तपास करीत आहेत आणि डीआयजी विश्‍वास नांगरे पाटील लक्ष ठेवून आहेत. कोल्हापुरातील काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकार्‍यांशी बोललो तेव्हा त्यांनीसुद्धा समाज माध्यमातून उमटणार्‍या उथळ प्रतिक्रियाबद्दल नापसंती व्यक्त केली आहे, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. याबद्दल दुमत नाही. एका सोशल मीडियाधारी मित्राने.. किरवले यांना दाभोलकर, पानसरे यांच्या रांगेत बसवले आणि अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिल्यावर त्याच्या इनबॉक्समध्ये त्याला प्रा. किरवले कोण होते? हे विचारले तेव्हा उत्तर द्यायचे सोडून त्याने मलाच धारेवर धरले. तुमच्यासारखे गांडू पुरोगामी आहेत म्हणूनच आम्ही प्रखर विचारवंत गमावत आहोत, तुम्ही गप्प कसे काय बसू शकता? असा प्रश्‍नही त्याने केला आणि शेवटी म्हणाला किरवले कोण आहेत हे महत्त्वाचे नाही, त्यांना नक्कीच मनुवाद्यांनी मारले असेल!

आपण समाज माध्यमवीर फारच उतावीळ झालो आहोत, सबसे पहले अपने ग्रूपपर…. हे मांडण्याच्या घाईत आपण काय करतो आहोत याचे भान आपण सोडत चाललो आहोत. संयम, प्रतीक्षा, शांत डोक्याने मांडणी करण्याच्या काळात आपण सामाजिक सौहार्द कलुषित करण्यावर भर देतो आहोत. काही लोकांना एखादी बातमी लोकांना सांगण्याची अतिघाई असते यापेक्षा आपणच सर्वात आधी… निषेध व श्रद्धांजली कशी अर्पण केली हे दाखवणे आवश्यक वाटते यातूनच पुढचा सगळा गोंधळ निर्माण होतो हे लक्षात घ्यायला हवे. किरवले सरांच्या हत्येमागे इतर कोणताही कंगोरा नसेल हे मीसुद्धा आज ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, तो आहेच हे गृहीत धरून भुई थोपटणेसुद्धा योग्य नाही, कुणीतरी चुकले अन् मीच कसा योग्य आहे हे मला दाखवायचे नाही, आपण सगळेच चुकतो आहोत यात माझाही समावेश आहे हे मला नम्रपणे सांगायचे आहे, आपण समजून घ्याल आणि भविष्यात त्याची पुनरावृत्ती टाळाल याची मला खात्री आहे.

महाराष्ट्रात कधीकाळी संत, विचारवंत आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची वैचारिक परंपरा होती. आपल्या पुढ्यात आलेल्या विषयाला सर्वांगांनी पारखून घेतल्यावर त्यावर विचार प्रकट केले जात होते. आता मात्र परंपरा मोडीत काढण्याच्या घाईत आपण अतिशीघ्र बनलो आहोत आणि कडवेसुद्धा. समाज माध्यमातून व्यक्त होणार्‍यात कट्टर आणि कडव्या लोकांची संख्या चिंता वाटावी एवढी आहे. कडवेपण कोणत्याही विचारांचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी अंतिमतः ते घातकच असते. डावे, उजवे, पुरोगामी, समाजवादी, गांधीवादी, बामसेफी किंवा मध्यममार्गी या सगळ्यांनीच सामाजिक विषयावर कमालीचा संयम ठेवून विवेकी भूमिका घेण्याची गरज आहे. 50 वर्षांपूर्वी सत्य शोधनातून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण झाला होता, त्याचे परिणामही महाराष्ट्राने भोगले आता नवशिक्षितांनी ज्ञानाच्या अहंकारातून नवे वाद निर्माण करून त्यांना टोकदार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, दुर्दैवाने यात सगळ्याच जाती धर्माचे हायली एज्युकेटेड लोक सहभागी होताना दिसतात हे फारच वेदनादायी आहे, त्यावर विवेकाचा मलम लावता आला तर बघा!
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

महाराष्ट्रात कधीकाळी संत, विचारवंत आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची वैचारिक परंपरा होती. आपल्या पुढ्यात आलेल्या विषयाला सर्वांगांनी पारखून घेतल्यावर त्यावर विचार प्रकट केले जात होते. आता मात्र परंपरा मोडीत काढण्याच्या घाईत आपण अतिशीघ्र बनलो आहोत आणि कडवेसुद्धा. समाज माध्यमातून व्यक्त होणार्‍यात कट्टर आणि कडव्या लोकांची संख्या चिंता वाटावी एवढी आहे.
पुरुषोत्तम आवारे पाटील – 9892162248