समाजवादी ‘दंगल’ सुरूच

0

लखनऊ : शनिवारी समाजवादी पक्षातील अंतर्गत कलह शमल्याचे चित्र रविवारी सपशेल फसवे असल्याचे दिसून आले. अखिलेश समर्थकांनी आज समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले. यात पक्षाचे राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखिलेश यादव यांची आश्‍चर्यकारक घोषणा केली. त्यांनी मुलायमसिंग यादव हे पक्षाचे मार्गदर्शक असल्याचेही जाहीर केले. त्यांनी या प्रकरणातील खलनायक शिवपाल यादव आणि अमरसिंग यांची पक्षातून हकालपट्टीही केली. या घोषणांमुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच काही तासांमध्ये मुलायमसिंग यादव यांनी एका पत्रकान्वये या निर्णयांना आक्षेप घेतला. आपण 5 जानेवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावले असून त्यात महत्वाचे निर्णय घेतले जातील असे त्यांनी घोषित केले. दरम्यान, त्यांनी रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल आदी अखिलेश यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याची घोषणादेखील केली. तर दुसरीकडे समाजवादी पक्षावर अखिलेश यांची पकड मजबूत असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या मुख्यालयावर कब्जा केला असून मुलायमसिंग हे एकाकी पडल्याचे चित्र रविवारी दिसून आले आहे.

अखिलेश समर्थक आक्रमक
शनिवारी समाजवादी पक्षात सलोखा झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमिवर आज रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहू नये असे आवाहन मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना केले होते. मात्र मुलायम यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत लखनऊत आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात कार्यकर्ते आणि नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या अधिवेशनात उत्तरप्रदेश सरकारमधील बहुतांश मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यात रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून या प्रस्तावास एकमताने अनुमोदन दिले. याप्रसंगी मुलायम सिंग यादव यांना पक्षाचे मार्गदर्शक बनवण्याचेही जाही करण्यात आले. याचसोबत अखिलेश गटाचे कट्टर विरोधक शिवपाल यादव यांना समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्याबरोबरच वादग्रस्त अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

मुलायम यांचे प्रत्युत्तर
अखिलेश यादव यांच्या गटाने भरगच्च राष्ट्रीय अधिवेशनात केलेल्या घोेषणांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असतांना मुलायम यांनी एका पत्रकान्वये आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी हे अधिवेशन घटनाबाह्य असून त्यात पारित करण्यात आलेले ठरावही नियमबाह्य असल्याचा दावा केला. तसेच हे कृत्य करणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे मुलायमसिंह यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. काही लोक केलेल्या दुष्कर्म आणि सीबीआयपासून स्वतःला वाचवण्यासाठी; तसेच भाजपला लाभ मिळवून देण्यासाठी हे नाटक तर असून त्याच लोकांनी आज कथितरित्या हे अधिवेशन आयोजित केले, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी 5 जानेवारीला सकाळी 11 वाजता पक्षाचे आपत्कालीन राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी पत्रकाद्वारे केली. त्यांनी रामगोपाल यादव यांच्यासह नरेश अग्रवाल या अखिलेश समर्थकाचीही हकालपट्टी केली.

पुढे काय?
समाजवादी पक्षातील वादाने आता वणव्याचे स्वरूप धारण केले आहे. अखिलेश यादव यांनी आता पक्षावर आपली पकड मजबूत केली आहे. यापुढील काळात ते पक्षासह पक्षाच्या चिन्हावर दावा दाखल करतील असे मानले जात आहे. तर दुसरीकडे मुलायमसिंग यादव हे पक्षात एकाकी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यासोबत बंधू शिवपाल यांच्यासह पक्षाचे मोजके नेते असल्याचे चित्र आहे. यामुळे त्यांनी 5 जानेवारी रोजी बोलावलेल्या अधिवेशनाला कितपत प्रतिसाद मिळणार? आणि त्यात काय घोषणा होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.