समांतर रस्त्यांसाठी कृती समितीची स्थापना

0

जळगाव । समांतर रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गावरील अपघात हा जळगावकरांसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर प्रवास करणार्‍यां नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात नित्याचेच झाले आहे. या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला असुन याला सुस्त प्रशासन जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी आणि समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चे झालेत परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर जळगावकरांनी एकत्र येऊन याविरुध्द लढा देण्याचे ठरविले. यासाठी विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली असुन ’जळगाव समांतर रस्ते कृती समिती’ असे या समितीचे नामकरण करण्यात आले आहे. यात शहरातील ७० पेक्षा अधिक सामाजिक संस्था, संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतुन देण्यात आली. यावेळी डॉ.राधेश्याम चौधरी, नगरसेवक अनंत जोशी, गजानन महालपुरे, फारुख शेख, विनोद देशमुख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी, विराज कावडीया आदी उपस्थित होते.

समितीला राजकीय भुमिका नाही

जळगावरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या समांतर रस्त्याच्या मागणीसाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन जळगाव कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून समांतर रस्ते, महामर्गासंबंधी विविध प्रश्‍नासंबंधी मागणी केली जाणार आहे. ही समिती कोणत्याही राजकीय पक्ष प्रेरीत नसुन समितीला कोणतीही राजकीय भुमिका नसणार आहे. तसेच समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव नेमले जाणार नसुन सर्वच सदस्याला समितीत सारखेच अधिकार असणार आहे.

समितीची कृती

सर्वप्रथम मनपा महापौर, आयुक्त, अभियंते यांच्याकडून रस्ते, जागा, मालकी, पुर्वीचा पत्रव्यवहार याची माहिती व कागदपत्रे घेणे., जुन्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध असलेले दस्तऐवज व त्याच्या प्रति मिळविणे.,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे व औरंगाबाद कार्यालयाकडून सद्यस्थितीची माहिती व कागदपत्रे मिळविणे., विशिष्ट दिनांक निश्‍चित करुन जळगाव हद्दीत दोन ठिकाणी महार्गावर रास्ता रोको आंदोलन करणे तसेच कृती समिती पुढील टप्पे कागदपत्रांची उपलब्धता व त्याचा अभ्यास करुन निश्‍चित करणार आहे.

९ रोजी महापौरांची भेट

समांतर रस्त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीचे ध्येय धोरण ठरविण्यात आले आहे. या समितीने कृती ठरली असुन यातील एक म्हणजे जळगाव मनपाचे महापौरांची भेट घेणे हा आहे. या अनुषंगाने आज गुरुवारी ९ रोजी महापौर नितीन लढ्ढा यांची भेट कृती समिती घेणार आहे. महापौरांकडून समांतर रस्त्यासंदर्भात मनपाची भुमिका काय आहे हे जाणुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पुढील धोरण ठरविली जाणार आहे. तसेच या धोरणाविषयी चर्चा केली जाणार आहे.

कृती समिती सदस्य

जळगाव समांतर रस्त्याच्या मागणीसाठी कृती समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत डी.डी.बच्छाव, शिरीष बर्वे, डॉ.प्रताप जाधव, डॉ.दिपक पाटील, डॉ.अनिल पाटील, विष्णु भंगाळे, अ‍ॅड.संजय राणे, अ‍ॅड.सुधीर कुलकर्णी, सचिन नारळे, करीम सालार, युसुफ मकरा, प्रविण पगारीया, मुकुंद सपकाळे, कैलास सोनवणे, अनंत(बंटी जोशी), नंदलाल गादीया, राजू अडवाणी, अमर जैन, मंगला बारी, शोभा बारी, प्रतिभा शिरसाठ, वैशाली विसपुते, सरिता माळी, स्वाती अहिरराव, शंभु पाटील, दिलीप तिवारी, डॉ.राधेश्याम चौधरी, संगिता पाटील, फारुख शेख, गजानन मालपुरे, विनोद देशमुख, अजिंक्य देसाई, रविंद्र नेरपगारे, पियुष पाटील, विराज कावडीया आदींची नेमणुक करण्यात आली आहे.