सभासद शेतकर्‍यांना दिलासा

0

धुळे । सभासद शेतकर्‍यांना पीकविमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेल्याने सभासद शेतकर्‍यांना पीकविमा नुकसान भरपाई मंजुर झाली असल्याची माहिती धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली. दोन विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 3 कोटीची रक्कम शेतकर्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात सततचा दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. दरवर्षी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर केली होती.

52 हजार 641 सभासदांचा 7 कोटी 84 लाखांचा विमा हप्ता
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व संचालक मंडळाने या पीकविमा योजनेचा प्रचार आणि प्रसार करुन बँकेच्या कर्जदार सभासदांना ही योजना सक्तीची करीत पीकविमा उतरविला होता. शिवाय कर्जातून या विम्याचा हप्ता कपात करुन तो विमा कंपनीला देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 37 हजार 659 सभासदांचा 5 कोटी 51 लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 982 सभासदाचा 2 कोटी 33 लाख मिळून सुमारे 52 हजार 641 सभासदांचा 7 कोटी 84 लाखांचा विमा हप्ता धुळे जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लि.मुंबई तर नंदुरबार जिल्ह्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर पीक विमा इन्शुरन्स कंपनी या शासनाने नियुक्त केलेल्या कंपन्याकडे भरण्यात आला होता.

धुळे जिल्ह्यासाठी 20 कोटी 59 लाख 91 हजार 890 रुपये मंजूर
विम्यापोटी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी सभासदांना पीक विमा नुकसान भरपाई म्हणून दोन्ही कंपन्यांकडून एकुण 2 कोटी 88 लाख रुपये मंजुर झाले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील 6 हजार 713 सभासदांना रिलायन्स जनरल इन्शुरन्स लि.मुंबई या कंपनीने 2 कोटी 68 लाख रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील 521 सभासदांना अ‍ॅग्रीकल्चर पीक विमा इन्शुरन्स कंपनी यांनी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. सदरची नुकसार भरपाई रक्कम ही शेतकरी सभासदांच्या बचत खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.याशिवाय हंगामातील प्रतिकुल परिस्थिती व हंगामाच्या अखेरीस शेतकर्‍यांना मिळालेले सरासरी उत्पन्न या आधारे धुळे जिल्ह्यासाठी 20 कोटी 59 लाख 91 हजार 890 रुपये मंजूर झाले आहेत. त्यात धुळे तालुक्यासाठी 6 कोटी 23 लाख 6 हजार 101 रुपये तर साक्री तालुक्यासाठी 3 कोटी 97 लाख 78 हजार 517 रुपये मंजूर झाले आहेत. शिंदखेडा तालुक्यासाठी 10 कोटी 8 लाख 48 हजार 356 रुपये तर शिरपूर तालुक्यासाठी 30लाख 58 हजार 916 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

15 दिवसात बचत खात्यावर जमा
या रक्कमेत जिल्हा बँकेला सर्वांत मोठा हिस्सा असून सर्कलनिहाय यादी प्राप्त होताच ही नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा बँक 15 दिवसात सभासदांच्या बचत खात्यावर जमा करणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांच्या सहकार्याने सततचा पाठपुरावा केल्याने ही नुकसान भरपाई मिळाल्याचे शेती व बिगर शेती कर्ज व्यवस्थापक डी.एस.धनराळे यांनी कळविले आहे. चालू हंगामातही सर्व कर्जदार सभासदांनी व बिगर कर्जदार सभासदांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे व मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी केले आहे.