सभापती निवडीवर लॉबींगची मोहर

0

मनपा स्थायी सभापतीपदी अ‍ॅड. शुचिता हाडा तर बालकल्याण सभापतीपदी शोभा बारी यांची वर्णी

जळगाव-मनपा स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत पार पडली.स्थायी सभापतीपदासाठी भाजपतर्फे अ‍ॅड.दिलीप पोकळे,अ‍ॅड.शुचिता हाडा,भगत बालाणी,राजेंद्र घुगे-पाटील यांचे अर्ज होते. एकाच पक्षातील चौघांचे अर्ज असल्यामुळे माघार कोण कोण घेणार यासाठी पेच निर्माण झाला होता. सभागृहातच नेत्यांच्या फोनमुळे ’कही खुशी,कही गम’ असे वातावरण झाले होते. अखेर तिघांनी आपले अर्ज मागे घेतले आणि सभापतीपदी अ‍ॅड.शुचिता हाडा यांची बिनविरोध निवड झाली. तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी एकमेव अर्ज असल्याने शोभा बारी यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जाहीर केले.यावेळी नुतन स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा आणि महिला बालकल्याण सभापती शोभा बारी यांचा सत्कार करण्यात आला.

मनपा स्थायी समितीच्या सभापती व महिला व बालकल्याण समितीची सभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.यावेळी व्यासपीठावर उपायुक्त मिनीनाथ दंडवते,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सुरुवातीला स्थायी सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया सुरु झाली. स्थायी सभापतीसाठी भाजपतर्फे अ‍ॅड.दिलीप पोकळे,अ‍ॅड.शुचिता हाडा,भगत बालाणी,राजेंद्र घुगे-पाटील यांचे अर्ज होते. चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटाचा अवधी देण्यात आला. आमदार राजूमामा भोळे यांचा फोन आल्यानंतर भगत बालाणी,अ‍ॅड.दिलीप पोकळे यांनी लगेच माघार घेतली.त्यानंतर अ‍ॅड.शुचिता हाडा यांनाही माघार घेण्यासाठी सांगण्यात आले.त्यांतर त्या सभागृहाच्या बाहेर जावून त्यांनी आणि त्यांचे पती अतुलसिंह हाडा यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर संवाद साधून माघार घेण्यास नकार दिला.दरम्यान,राजेंद्र घुगे-पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे सभापतीपदी अ‍ॅड.शुचिता हाडा यांची बिनविरोध निवड झाली.

कोरमनंतर बालकल्याण सभापती निवड
स्थायी समिती सभापतीनिवडीनंतर महिला व बालकल्याण समितीची सभापती निवडीची प्रक्रिया सुरु झाली.मात्र सभागृहात 9 सदस्यांपैकी केवळ शोभा बारी,गायत्री शिंदे,आणि शेख हसीनाबी या तीनच सदस्या उपस्थित होत्या. कोरमअभावी सभापती निवडीची सभा रद्द होण्याची शक्यता होती.त्यामुळे प्रशांत नाईक,सुरेश सोनवणे आणि अतुल बारी यांनी शेख शबानाबी सादीक यांना बोलावले. त्यांची प्रकृती ठिक नसतांनाही त्या सभागृहात आल्या. आणि त्यानंतर निवडीची प्रक्रिया सुरु झाली. महिला व बालकल्याण समितीची सभापतीपदासाठी शोभा बारी यांचे एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शोभा बारी यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

सभापतीनिवडीनंतर जल्लोष
मनपा स्थायी समिती सभापतीपदी अ‍ॅड.शुचिता हाडा आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा बारी यांची बिनविरोध झाल्यानंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. निवडीनंतर नुतन स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा आणि महिला बालकल्याण सभापती शोभा बारी यांनी पदभार घेतला.

शाश्‍वत विकासावर देणार भर
जळगावच्या जनतेसाठी संधी मिळाली आहे.पक्षश्रेष्ठींनी दिलेली संधी सार्थक करण्याचा प्रयत्न करणार आहे.विकासाची पायाभरणी झालेली आहे.विकासाचा कळस उभारायचा आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य, खराब रस्ते चांगले करण्याच्या कामांना प्राधान्य देणार. तसेच महिलांसाठी सार्वजनीक शौचालय उभारणीसाठी आधी प्राधान्य देवून शाश्‍वत विकासाला प्राधान्य देणार आहे.

  • अ‍ॅड. शुचिता हाडा,
    नुतन स्थायी सभापती

महिलांपर्यंत सुविधा पोहचविणार
पक्षश्रेष्टींनी महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची दिलेली जबाबादारी यशस्वी पणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. शासनाच्या विविध योजना तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरातील जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला अधिकपणे प्राधान्य राहिल.

  • शोभा बारी,
    नुतन बालकल्याण सभापती
Copy