सभापती निवडीत भाजपचा महागोंधळ

0

जळगाव: सोमवारी 6 रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. भाजपने यापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्याने सभापतीपदीही भाजपचाच विजय होणार हे निश्चित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणे महाविकास आघाडी उमेदवार दिले, मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला पुन्हा अपयश आले. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव सोपा मात्र भाजपचा विजय हा पक्षासाठी पराभवासमानच ठरला. कारण सभापती निवडणुकीत पक्षाने शिक्कामोर्तब केलेल्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आणि ऐनवेळी नाराजीनाट्यातून पुढे आलेल्यांच्या पदरी सभापतीपद पडले. नाराजी नाट्यामुळे भाजपचे गणित बिघडले. निवडणुकीत भाजपचा विजय झाला, मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारांना माघार घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीपेक्षा भाजपला सभापतीपदाची निवडणूक अधिक त्रासदायक आणि कसोटीची ठरली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपचा 31 विरुद्ध 34 असा विजय झाला होता. मात्र सभापतीपदाच्या निवडीत भाजपची संख्याबळ वाढली. सभापतीपदाची निवडणूक भाजपने 29 विरुद्ध 35 मतांच्या फरकाने जिंकली. जयपाल बोदडे यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली गायकवाड, ज्योती पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच कल्पना कल्पना पाटील, रविंद्र पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेखा पाटील, उज्ज्वला पाटील यांनी राष्ट्रवादीच्या डॉ.नीलम पाटील यांचा पराभव केला. 6 मताच्या फरकाने भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघावर अन्याय

उपाध्यक्ष पदासह एक सभापतीपद जळगाव लोकसभा मतदारसंघाकडे देण्याचे नियोजन भाजपने केले होते. ठरल्याप्रमाणे नियोजन भाजपने केले. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. निवडणुकीनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला एकही सभापतीपद आले नाही. पाचोरा तालुक्यातील मधुकर काटे यांच्या रूपाने एक सभापतीपद मिळणार होते. मात्र ते होऊ शकले नाही. सभापती निवडीत पक्षाने जळगाव लोकसभा मतदारसंघावर अन्याय केल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकमेव चाळीसगावचे आमदार वगळता भाजपचा एकही आमदार जळगाव ग्रामीण लोकसभा मतदार संघात नाही, त्यामुळे जि.प.च्या माध्यामातू सभापतीपद देऊन पक्ष वाढीसाठी मदत झाली असती. मात्र ते नियोजन पक्षाला जमले नसल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

तीन सदस्यांची बंडखोरी

रविंद्र पाटील यांनी भाजपने त्यांच्या नावाचा अर्ज घेतला नसल्याने जि.प.त संताप केला. रविंद्र पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांशीही भांडण केले. आम्हाला दोन-दोन कोटींची ऑफर विरोधी पक्षांकडून येत होती, मात्र आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. तरीही संधी दिली नसल्याने गोंधळ घालत सभापतीपद मिळवून घेतले. दुसरीकडे चोपडा तालुक्यातील उज्ज्वला माळके, गजेंद्र सोनवणे यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केले. तिघांच्या बंडखोरीने भाजपला मोठा मनस्ताप झाला.

माळकेंची लॉटरी, देशमुखांचा तांत्रिक बळी

भाजपने जयपाल बोदडे, ज्योती पाटील, रविंद्र पाटील, अमित देशमुख यांची नावे सभापतीपदासाठी निश्चित केले. ठरल्याप्रमाणे उज्ज्वला माळके, मधुकर काटे, गजेंद्र सोनवणे यांना माघार घेण्याचे ठरले होते. मात्र ऐनवेळी अर्ज प्रक्रियेत तांत्रिक गोंधळ झाल्याने उज्ज्वला माळके यांचा अर्ज कायम राहिला. त्यामुळे त्यांना अनपेक्षित सभापतीपद मिळाले. मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अमित देशमुख यांना देण्यात येणारे सभापतीपद अर्जातील चुकीमुळे गमवावे लागले. एकीकडे माळके यांना लॉट्रीच लागली तर देशमुख यांना बळी द्यावे लागले.

अध्यक्षांसह चार सभापती रावेरकडे

भाजपने यावेळी अध्यक्षपद रावेर लोकसभा मतदारसंघाकडे तर उपाध्यक्षपदाचे खांदेपालट करण्याचे ठरविले होते. त्यामुळे रावेरकडील एक सभापतीपद आणि उपाध्यक्षपद जळगाव लोकसभा मतदारसंघाकडे येणार होते. मात्र निवडणुकीदरम्यान घडलेल्या नाराजीनाट्यामुळे चारही सभापतीपद रावेर लोकसभा मतदारसंघाकडे गेले. केवळ उपाध्यक्ष पदावर जळगाव लोकसभा मतदारसंघाची बोळवण करण्यात आले आहे. चारपैकी तीन सभापतीपद हे चोपडा विधानसभा मतदारसंघाकडे गेले आहे. ज्योती पाटील, उज्ज्वला माळके आणि रविंद्र पाटील यांचे गट चोपडा मतदार संघात येतो. एक सभापतीपद जयपाल बोदडे यांच्यारूपाने मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात गेले आहे.

जळगाववर अन्याय: मधुकर काटे

एक सभापतीपद जळगाव लोकसभा मतदारसंघाकडे देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटनाघडामोडीमुळे जळगाव लोकसभेच्या वाट्याला काहीच आले नाही. पक्ष निष्ठावंतांना न्याय देण्यात अपयशी ठरले. पक्षाविषयी कोणतीही नाराजी नाही मात्र पात्रता नसलेल्या आणि पक्षाशी काहीही निष्ठा नसलेल्यांना संधी देण्यात आल्याची खंत असल्याची भावना भाजपचे मधुकर काटे यांनी व्यक्त केली.

आवाज उठविणार्‍यांवर अन्याय: पल्लवी सावकारे

प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या चुकीच्या कामावर नेहमीच आवाज उठविला. सत्तेत असूनही लोकांसाठी भांडत राहिले. अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही, मात्र सभापती पदाची तरी संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र संधी देण्यात आली नाही. सभागृहात चुकीच्या पद्धतीने होणार्‍या कामावर आवाज उठविणार्‍यांनाच पक्षाने बाजू केल्याची खंत आहे. पक्षाविषयी कोणतीही नाराजी नाही. मात्र निष्ठावंतांना संधी मिळाली नसल्याची खंत आहे. यापुढे पक्षाचे आदेश मान्य करून काम करत राहणार अशी भावना पल्लवी सावकारे यांनी व्यक्त केली.

भाजपकडून अर्जाचा महागोंधळ

विषय समिती क्रमांक एकसाठी अर्ज दाखल करताना भाजपकडून मोठा घोळ झाला. विषय समिती एकसाठी अमित देशमुख तर दोनसाठी रविंद्र पाटील यांचे नाव निश्चित होते. मात्र चुकीने विषय समिती एकसाठीच रविंद्र पाटील, अमित देशमुख आणि मधुकर काटे या तीन सदस्यांनी अर्ज भरल्याने भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला. तीन पैकी मधुकर काटे यांनी माघार घेण्याचे ठरले होते. त्यानंतर अमित देशमुख आणि रविंद्र पाटील या दोघांची सभापतीपदी वर्णी लागणार होती. मात्र अमित देशमुख आणि रविंद्र पाटील या दोघांनीही विषय क्रमांक एक समितीसाठी अर्ज दाखल केल्याने नाईलाजाने अमित देशमुख यांना माघार घ्यावे लागले.

सभा सुरु झाल्यानंतर हा घोळ समोर आला. घोळ लक्षात आल्यानंतर भाजप सदस्यांची त्रिधातीरपीठ उडाली. या मोठ्या पेचप्रसंगी ऐनवेळी कोणी माघार घ्यावी? यावरून सभागृहात वाद सुरु झाले. शेवटी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे निकटवर्तीय अमित देशमुख यांना माघार घेण्याची सूचना केली. गिरीश महाजन यांचं आदेशानंतर देशमुख यांनी माघार घेतली.

Copy