सफाई मक्तेदाराकडील घंटागाड्यासह 168 वाहने मनपाच्या ताब्यात

0

मक्तेदार असमर्थ ठरत असल्याने मनपाचा निर्णय; पर्यायी व्यवस्थेची हालचाल

जळगाव– शहरातील साफसफाईसाठी मनपाने वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून मक्तेदाराने कामबंद केले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचराकोंडी झाली आहे. पदाधिकार्‍यांसह नगरसेवक आणि नागरिकांकडूनही प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. सफाई आणि कचरा संकलनासाठी मक्तेदार असमर्थ ठरत असल्याने मनपा प्रशासनाने मक्तेदाराकडील घंटागाड्यासह 168 वाहने ताब्यात घेतली आहेत.

शहरात स्वच्छता होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रशासन ,पदाधिकारी आणि मक्तेदारामध्ये तिढा निर्माण झाला आहे. 400 कामगार अपेक्षित असतानाही कामगारांचा अभाव दिसून येत असल्याने समाधानकारक स्वच्छता होतांना दिसून येत नाही.त्यामुळे मक्तेदाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसापूर्वी मक्तेदाराला मक्ता रद्द का करु नये म्हणून अंतिम नोटीस देखील बजावण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांपासून मक्तेदाराने कामबंद केल्याने मक्तेदारासह प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. चार दिवसापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी उपोषण केले होते. या उपोषणाला उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी पाठिंबा देऊन मक्ता रद्दची मागणी केली होती. दरम्यान,उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी मक्तेदाराला पत्र देवून मनपाने पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेतला असून आपल्याकडे असलेली मनपाची वाहने मनपाच्या ताब्यात घेण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार शुक्रवारी 100 घंटागाड्यासह 168 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

..तर मक्तेदाराला पुन्हा संधी

शहरात सफाई आणि कचरा संकलनासाठी तयारी दर्शविल्यास आणि पुरेसे कामगाराच्या माध्यमातून स्वच्छतेची व्यवस्था करण्याची हमी दिल्यास संधी दिली जाईल असेही मनपा प्रशासनाने मक्तेदाराला पत्राद्वारे कळविले आहे. तसेच मनपाच्या ताब्यात घेण्यात आलेली वाहने देण्यास आयुक्तांनी मान्यता दिल्यास मक्तेदाराला देण्याची तयारी देखील प्रशासनाने दर्शविली आहे.

Copy