सन्मान दिला तर शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला जाणार

0

रत्नागिरी । शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला अनुपस्थित राहण्याचं कारण नाही. सर्व काही सन्मानपूर्वक होत असेल तर भूमीपूजनाला जाणार. चांगल्या कामासाठी आमचा नेहमीच पाठिंबा असतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, मुख्यमंत्री आणि मी संपर्कात आहोत. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याची गरज नाही, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणत ठाकरे यांनी शिवस्मारकाच्या उपस्थितीवरुन सुरु झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रोटोकॉलच्या काही अडथळ्यांमुळे उद्धव ठाकरे भूमीपूजनाला जाणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

कोळी बांधवांशी चर्चा गरजेची
शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला स्थानिक मच्छिमारांनी विरोध केला आहे. पंतप्रधानांसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवस्मारकाला विरोध असणार्‍या कोळी बांधवांशीही चर्चा व्हायला हवी. कोळी बांधवांची मतंही लक्षात घ्यायला हवी.

मच्छिमार आंदोलन छेडणार
24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार असल्याने सरकार जय्यत तयारीत केली जात आहे. तर दुसरीकडे, स्थानिक मच्छिमारांकडून शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला विरोध केला जात आहे. त्याचसोबत, पंतप्रधानांसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक मच्छीमार संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.