सत्यपालसिंग राजपूत यांना कवीवर्य नीळकंठ महाजन स्मृती पुरस्कार प्रदान

0

जळगाव । मराठी साहित्य क्षेत्रात मानाचा कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती पुरस्कार युवा कवी सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. कवी रवींद्र इंगळे चावरेकर यांच्या हस्ते केला राजपूत यांचा सन्मान केला. पाच हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानतर्फे कवितासंग्रह प्रकाशित नसलेल्या व दर्जेदार काव्यलेखन करणार्‍या कवीला हा पुरस्कार देण्यात येतो. बेंडाळे महाविद्यालयात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय लुल्हे, प्राचार्य एस.एस. राणे, उपाध्यक्ष राजू बाविस्कर, कोषाध्यक्ष वंदना माळी, प्रमोद माळी, सचिव संजय सपकाळे उपस्थित होते.

प्रसिद्धीच्या हव्यासाने कवित्व संपण्याची भीती- सत्यपालसिंग राजपूत: पुरस्कार मिळाल्याने साहित्यनिर्मितीसाठी अनोखी उर्जा मिळते. ही उर्जा माझ्या गुरूंकडून घेताना अजून जास्त जबाबदारी वाढल्याची जाणीव होत आहे. नीलकंठ महाजन यांच्यासारख्या दर्जेदार कवीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मला मी चांगले काहीतरी केले असल्याची जाणीव करून देत असल्याची प्रतिक्रिया पुरस्कारप्राप्त कवी सत्यपालसिंग राजपूत यांनी व्यक्त केली. प्रसिद्धीचा हव्यास माणसाला गिळंकृत करू शकतो. कवी देखील यापासून वाचलेला नाही. प्रसिद्धीच्या हव्यासाने कवित्व संपण्याची जास्त भीती असते. मात्र योग्य वाचन, सभोतालाचे निरीक्षण आणि आपण जगत असलेली परिस्थिती आपल्याला चांगलं काहीतरी लिहायला भाग पाडत असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

काव्यवाचनाने अभिवादन
मराठी राजभाषा दिन आणि नीलकंठ महाजन स्मृति पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने काव्यवाचनाचा देखील कार्यक्रम यावेळी पार पडला. यावेळी युवा कवी नामदेव कोळी, मोरेश्‍वर सोनार, मोना तडवी यांनी नीलकंठ महाजन यांच्या कवितांचे सादरीकरण केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवी सत्यपालसिंग राजपूत यांनी देखील आपल्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

कवितेतील जाणीवा समृध्द
नीलकंठ महाजन हे माझे पूर्वज तर सत्यपालसिंग हा माझा वंशज. त्यामुळे पूर्वजाच्या नावाने दिला जाणार पुरस्कार वंशजाला देतानाची अद्वितीय अनुभूती घेत असल्याची प्रतिक्रिया भाषा अभ्यासक व कवी रवींद्र इंगळे चावरेकर यांनी दिली. सत्यपालसिंग यांच्या कवितेतील जाणीवा या समृद्ध करणार्‍या आहेत. भविष्यात देखील त्यांच्याकडून उत्तमोत्तम साहित्याची अपेक्षा केली जाऊ शकते असे सांगत त्यांनी सत्यपालसिंग यांचे अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य एस.एस राणे यांनीदेखील पुरस्कारप्राप्त सत्यपालसिंग यांचे अभिनंदन करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्यजित साळवे यांनी केले तर प्रास्ताविक संजय सपकाळे यांनी व परिचय नामदेव कोळी यांनी करून दिला.