सट्टा बाजारातही भाजपला कौल

0

मुंबई । पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधील अंदाज पाहिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केवळ पंजाबचा अपवाद वगळता भाजप उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या पाच राज्यांच्या एक्झिट पोलचे पडसाद सट्टा बाजारातही उमटले. देशातील अनेक सट्टा बाजारात भाजपला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला असताना सट्टा बाजाराने मात्र याठिकाणी त्रिशूंक परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे. या सर्व ठिकाणी 11 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या सट्टा बाजारांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवला आहे. गुजरातमधील सट्टा बाजाराने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सत्तेसाठी फेव्हरेट असलेल्या भाजपला उत्तर प्रदेशात 200 ते 203 जागा मिळतील, असा अंदाज सट्टा बाजाराकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 202 ही मॅजिक फिगर आहे. समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला उत्तर प्रदेशात 120 ते 125 जागा मिळतील, तर बसपला 60 ते 62 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज सट्टा बाजारातून व्यक्त होतो आहे. गुजरातच्या सट्टा बाजाराने उत्तराखंडमध्येही काँग्रेेसऐवजी भाजपच्या सरकारला पसंती दिली आहे. गुजरातमध्ये भाजपला 40 ते 45, काँग्रेसला 20 ते 23, तर बसपला 3 ते 4 जागा मिळतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.

गोव्यात मात्र सत्ताधारी भाजप सत्ता टिकवू शकेल, असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. 40 आमदार असलेल्या गोव्याच्या विधानसभेत भाजपला 22 ते 24, काँग्रेसला 14 ते 16 आणि आम आदमी पक्षाला 3 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज सट्टा बाजारातून व्यक्त होतो आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात पराभवाची शक्यता असलेल्या काँग्रेसला पंजाबमध्ये यश मिळेल, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. काँग्रेसला पंजाबमध्ये 50 ते 53, आम आदमी पक्षाला 52 ते 55 आणि भाजप-अकाली दलाला 10 ते 12 जागा मिळतील, असा सट्टा बाजाराचा अंदाज आहे.