सचिवाला ठोठावलेली एक वर्षाची शिक्षा कायम

0

जळगाव । चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवाने अपहार केल्या प्रकरणी 27 जुलै 1995 रोजी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात चाळीगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी 27 ऑगस्ट 2014 रोजी 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात सचिवाने वरीष्ठ न्यायालयात अपिल केले होते. या प्रकरणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. या सचिवाने अपहारातले 214 रुपये भरले नसल्याने ही शिक्षा सुनावली.

माळशेवगे येथील विविध कार्यकारी सोसायटीतील सचिव बापुराव नथू पाटील (वय 72) याने 26 जून 1992 ते 13 जानेवारी 1993 दरम्यान सोसाटीत 20 हजार 214 रुपयांचा अपहार केला होता. त्यात मयत कर्जदार सभासदाच्या पत्नीने जमा केलेले पैस सोसायटीच्या खात्यात न टाकता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. तसेच कर्जदाराने पैसे भरल्यानंतर मूळ पावतीवर जास्त रक्कम आणि कार्बन कॉपीवर कमी रक्कम दाखवून हा अपहार केला होता. या प्रकरणी शासकीय लेखापरीक्षक रमेश सुखराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 27 जुलै 1995 रोजी चाळीसागाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात बापुराव पाटील याने अपहारातील 20 हजार रुपये भरले. मात्र अपहाराच्या रकमेतील 214 रुपये भरले नव्हते. या प्रकरणी चाळीसगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी 27 ऑगस्ट 2014 रोजी 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात पाटील याने वरीष्ठ न्यायालयात अपिल केले होते. या प्रकरणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यात सरकारतर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी युक्तिवाद केला. त्यात मंगळवारी न्यायाधीश नांदेडकर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर आरोपी पाटील याची कारागृहात रवानगी केली.

सरकारपक्षाचा अंतिम लेखी युक्तीवाद सादर
जळगाव । रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणे खून खटल्यात मंगळवारी सरकार आणि फिर्यादपक्षातर्फे अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात अंतिम लेखी युक्तिवाद सादर केला. या खटल्यात मौखिक युक्तिवाद 7 मार्च रोजी होणार आहे.प्रशांत सोनवणे खून खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी तर फिर्यादी राधाबाई सोनवणे यांच्यातर्फे अ‍ॅड. मुकेश शिंपी यांनी मंगळवारी लेखी युक्तिवाद सादर केला.