पायलट यांची वापसी; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याची मध्यस्थी ठरली यशस्वी

0

नवी दिल्ली: राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड केल्याने कॉंग्रेस सरकार अडचणीत आले. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. त्यानंतर सचिन पायलट हे कॉंग्रेस सोडतील असे चिन्ह होते. मात्र त्यांनी अद्यापही पक्ष सोडलेला नाही. दरम्यान त्यांची पुन्हा घरवापसी होणार असून काल त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली आहे. सचिन पायलट लवकरच कॉंग्रेसमध्ये दाखल होतील असे बोलले जात आहे. मात्र सचिन पायलट यांचे बंड मागे घेण्यामागे आणि कॉंग्रेसमध्ये वापसी करण्यासाठी महाराष्ट्रातील एका नेत्यांने मोठी भूमिका बजावली आहे. राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे खासदार राजीव सातव यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे.

राजीव सातव सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात होते. हायकमांड आणि सचिन पायलट यांच्यातील ते मोठा दुवा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले होते.

सचिन पायलट यांनी शनिवारी प्रियांका गांधी वाड्रा यांना फोन करून आपला काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रियांका यांनी पुढाकार घेऊन पायलट आणि राहुल गांधी यांची भेट घडवून आणली. या बैठकीला त्याही स्वत:ही हजर होत्या. सुमारे एक तास चाललेल्या चर्चेअंती सचिन पायलट काँग्रेसमधून बाहेर पडणार नाहीत आणि अधिवेशनाला हजर राहून गेहलोत सरकारला पाठिंबा देतील, हे स्पष्ट झाले.

Copy