सचिन पायलट ज्योतिरादित्य सिंधीयांच्या मार्गावर; २५ आमदार घेऊन दिल्लीत दाखल

0

नवी दिल्ली : मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमधील काँग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची चिंता वाढली आहे. राजस्थानच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २५ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तेथे ते भाजपची सत्ता असलेल्या भागातील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन पायलट हे आता ज्योतिरादित्य सिंधिया होण्याच्या मार्गावर आहेत अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या कथित प्रयत्नांच्या प्रकरणात पोलिसांच्या विशेष संचालन गटाने चौकशी सुरू केली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. सरकारचे प्रमुख अधिकारी महेश जोशी यांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. कमीत कमी १० ते १२ आमदार व इतरांनाही नोटिसा जारी करण्यात येणार आहेत. चौकशीत असे निष्पन्न झाले की, दोन ते तीन आमदार हे भाजपच्यावतीने इतर आमदारांना पैसे देऊन वळविण्यात सामील होते. त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष गटाने सरकार पाडण्याच्या प्रयत्नांबाबत दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोन जण गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठीच्या घोडेबाजारात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Copy