सचखंड एक्स्प्रेसमधून सफाई कर्मचार्‍याने रेल्वे प्रवाशाला फेकले

A passenger was thrown from the Sachkhand Express between Waghli-Kajgaon चाळीसगाव : एसी कोचमध्ये बसलेल्या भिक्षेकरी प्रवाशाशी झालेल्या वादानंतर सचखंड एक्स्प्रेसमधील सफाई कर्मचार्‍याने प्रवाशाला धावत्या रेल्वेबाहेर फेकल्याची घटना चाळीसगावपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील वाघळी-कजगावदरम्यान मंगळवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ही घटना घडत असताना एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने पाहिल्यानंतर त्याने औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवल्यानंतर तातडीने यंत्रणा हलली व आरोपी सफाई कर्मचार्‍यास बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, रेल्वेतून बाहेर फेकण्यात आलेल्या रेल्वे प्रवाशाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात सफाई कर्मचार्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वादानंतर प्रवाशाला रेल्वेबाहेर फेकले
वाघळी ते कजगावदरम्यान मंगळवार, 2 रोजी सचखंड एक्सप्रेसच्या एसी कोच क्रमांक बी- 3 मधून प्रवासी करीत असलेल्या भिक्षेकरी प्रवाशाला रेल्वेबाहेर फेकण्यात आल्याची घटना वाघळी-कजगावदरम्यान घडली होती. ही घटनेचे नेमके कारण समोर आले नसलेतरी एसी डब्यात प्रवासी चढल्यानंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आरोपी प्रवाशाला बाहेर फेकत असल्याची घटना प्रत्यक्षदर्शी एका प्रवाशाने पाहताच औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली व त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर आरोपी सफाई कामगाराच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले.

रेल्वेतून फेकलेला प्रवाशाचा मृतदेह आढळला
चाळीसगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना कजगावजवळ रेल्वेमार्गाच्या बाजूला झुडूपात 55 ते 60 वर्षे वयाच्या भिक्षेकरी असलेल्या प्रवाशाचा मृतदेह आढळला असून हा प्रवासी चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून गाडीत बसल्याची माहिती समोर आली आहे मात्र मृताची ओळख पटलेली नाही.