सगळे शेतकरी मेल्यावर योग्य वेळ येणार काय?

0

मुंबई:- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ऐरणीवर आला. तिसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी विधानभवनासमोर जोरदार निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमी भाव द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. सभागृहात देखील याच मागणीसाठी विरोधी पक्षाने रान उठवले. सध्या राज्यात सर्वात महत्वाचा प्रश्न हा शेतकरी आत्महत्या असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 12 वाजेपर्यंत दोन वेळा स्थगित केले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार? असा खडा सवाल उपस्थित केला. सगळे शेतकरी मेल्यावर मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ येणार आहे का? असे म्हणत अजित पवार यांनी मागणीला जोर दिला. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरंजामी सरकार धिक्कार असो, मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय- हाय यांसारख्या घोषणांनी परिसर निनादुन गेला.